सांगलीत बँक ऑफ बडोदाला २३ कोटींचा गंडा घालणारा अटकेत
By शरद जाधव | Published: September 20, 2022 09:53 PM2022-09-20T21:53:09+5:302022-09-20T21:54:27+5:30
आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बेदाणा, हळदीचा माल तारण ठेवून त्या मोबदल्यात कर्ज घेऊन परस्पर तो शेतीमाल विकून बँक ऑफ बडोदाला २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्यास अटक करण्यात आली. अजित नारायण जाधव (वय ४५, रा. विश्रामबाग, सांगली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथील सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीचे मिरज-तासगाव रोडवर कोल्ड स्टोअरेज उभारण्यात आले होते. या कोल्ड स्टोअरेजमध्ये बेदाणा, हळदीचा साठा होता. कंपनीने हा शेतीमाल बडोदा बँकेकडे तारण ठेवून शेतकऱ्यांच्या नावे २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्याशिवाय शेतीमालाची विक्री न करण्याचा करारही कंपनीने बँकेसोबत केला होता. मात्र, या कराराचा भंग करत मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत कोल्ड स्टोअरेजमधील शेतीमाल बँकेच्या परवानगीविनाच परस्पर विकण्यात आला होता. कर्जासाठी तारण ठेवलेल्या बेदाण्याची विक्री करण्यात आल्याचे बँकेच्या लक्षात येताच त्यांनी सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह एरिया व्यवस्थापकाविरोधात पोलिसांत फिर्याद दिली होती.
फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तेव्हापासून कंपनीचा व्यवस्थापक असलेल्या अजित जाधवचा पोलिसांकडून शोध सुरू होता. अखेर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
चौकट
जाधवला नऊ दिवसांची कोठडी
गेल्या दोन वर्षांपासून पोलीस जाधवच्या शोधात हाेते. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरूच होता. जाधव याला जेरबंद करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.