बँक घोटाळ्यातील आरोपींवर पोलिसांची कृपादृष्टी; स्टिंग ऑपरेशनमध्ये खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 02:48 PM2023-08-29T14:48:06+5:302023-08-29T14:48:53+5:30
प्रत्येक गाडीत सीसीटीव्ही कॅमेराही आहे. त्यामुळे ज्या ज्या तारखांना वाधवान यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले, त्याची सर्व पडताळणी करण्यात येईल अशी माहिती डीसीपी संजय पाटील यांनी दिली.
मुंबई – देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपावरून डिएचएफएलचे माजी संचालक कपिल आणि धीरज वाधवान सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये बंद आहेत. देशातील १७ बँकांना चूना लावणारे वाधवान बंधू जेल प्रशासनाच्या वरदहस्तामुळे ऐशमध्ये शिक्षा भोगत आहेत. दोघेही मेडिकल चाचणीच्या नावाखाली आठवड्यातून अनेकदा जेलमधून हॉस्पिटलला जातात. ज्याठिकाणी पार्किंगमध्ये त्यांची विविध लोकांसोबत मिटिंग होते, वाधवान कुटुंबातील सदस्यही तिथे हजर असतात. इतकेच नाही तर दोघे मोबाईल-लॅपटॉपचा वापर करतात. घरातील आणलेले जेवण जेवतात असा प्रकार आता समोर आला आहे.
वाधवान बंधू मेडिकल चाचणीसाठी आठवड्यातून ३-४ वेळा जेलमधून हॉस्पिटलला जातात. मागील वेळी ७ ऑगस्टला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये कपिल वाधवानला चेकअपसाठी आणले होते. तर ९ ऑगस्टला धीरज वाधवान यांना जेजे रुग्णालयात आणले होते. याठिकाणी वाधवान बंधू उपचारांऐवजी आपापल्या कारमध्ये बसून कुटुंबातील सदस्य आणि निकटच्या लोकांना भेटत होते. कारमध्ये कौटुंबिक विषयांपासून उद्योगाशी निगडीत चर्चा केल्या जातात. अनेक तास हा प्रकार सुरू असतो. या दोन्ही भावंडांना जेव्हापासून तळोजामध्ये ठेवले आहे तेव्हापासून ही स्पेशल ट्रिटमेंट दिली जात आहे. ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सर्व कैद झाले आहे.
तपासानंतर कारवाई करणार - फडणवीस
या बातमीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संबंधित प्रकरणाचा तपास केला जाईल. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी सांगितले. तर वाधवान बंधूला जे कर्मचारी हॉस्पिटलला घेऊन जातात ते नवी मुंबई पोलीस खात्याचा स्टाफ आहे. ही बातमी आम्ही वाचली. प्रथमदर्शनी ते चुकीचे असल्याचे दिसते. दोषींवर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना होणार नाही यासाठी आम्ही लक्ष देऊ. ज्या गाड्या आरोपींना घेऊन जातात. त्यात जीपीएस लावले आहेत. प्रत्येक गाडीत सीसीटीव्ही कॅमेराही आहे. त्यामुळे ज्या ज्या तारखांना वाधवान यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले, त्याची सर्व पडताळणी करण्यात येईल अशी माहिती डीसीपी संजय पाटील यांनी दिली.
कोविड काळातही वाधवान बंधू चर्चेत
राज्यात कठोर लॉकडाऊन असताना कुणालाही अनावश्यक बाहेर फिरणे यावर बंदी होती. अशा काळात वाधवान बंधू ५ अलिशान कार्समधून २३ कुटुंबियांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वर गाठले होते. या प्रकरणावरून भाजपाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. थेट गृह मंत्रालयातून वाधवान बंधू यांना प्रवासासाठी शिफारस पत्र भेटल्याचे तेव्हा समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता.