बारामती-फलटण रस्त्यावर खुलेआम सुरू आहे मटका , शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:32 AM2019-02-05T00:32:41+5:302019-02-05T00:33:02+5:30
सांगवी, माळेगाव परिसरात पोलिसांच्या गाफील कारभारामुळे अवैध धंदेवाल्यांनी आता चांगलेच तोंड वर काढलेले दिसत आहे. त्यांच्यावर तालुका पोलिसांचे कोणत्याही प्रकारे दडपण नसल्याने मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंदे वाढू लागले आहेत.
सांगवी - सांगवी, माळेगाव परिसरात पोलिसांच्या गाफील कारभारामुळे अवैध धंदेवाल्यांनी आता चांगलेच तोंड वर काढलेले दिसत आहे. त्यांच्यावर तालुका पोलिसांचे कोणत्याही प्रकारे दडपण नसल्याने मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंदे वाढू लागले आहेत. याचा परिणाम आता थेट शालेय विद्यार्थ्यांवर देखील होऊ लागला आहे. त्यामुळे पालकांची मुलांविषयी चिंता वाढली आहे.
सांगवी येथे भर चौकात बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला खुलेआम खुर्च्या टेबल मांडून अद्यापही मोठ्या प्रमाणात मटक्याचे बुके घेतले जात आहेत. ही सर्व बाब पोलीस प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध व्यावसायिकांवर बारामतीचे पोलीस प्रशासन गाफील झाले असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बारामतीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाईचा बडगा उचलण्यासाठी जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत. अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याची धमक आता पोलीस प्रशासनात राहिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कडेला टेबल खुर्च्या मांडून मटका व्यवसाय थाटात सुरू असल्याने, सांगवी येथील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील ३-४ गावांमधून ही मुली याच रस्त्याने चालत ये-जा करत असतात. हेच धंदे या शालेय मुलांचे येता जाता लक्ष वेधून घेत आहेत.
यामुळे त्यांच्यावर याचा परिणाम होत आहे. काही मुलांच्यात या धंद्याबाबत उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे पैशाच्या हव्यासापोटी काही लहान मुले ही आता लपूनछपून मटक्याच्या अड्ड्यावर येऊन मटका खेळून पैसा उडवू लागले आहेत. पण देशाचे भविष्य या शालेय विद्यार्थ्यांवर असते.
विद्यार्थीदशेत असताना त्यांना वाईट मार्गाने कमी वेळात जास्त पैसा मिळण्याचे साधन उपलब्ध होऊ लागल्याने हीच मुले भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेने जाणारा मार्ग शोधू लागतात. याच मुलांचे भविष्य धोक्यात येतेय की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगवी, माळेगाव परिसरासह इतर गावांतही जुगार, दारू, मटका, व्यवसाय जोरदार सुरू आहेत. यातच हे अधिकारी समाधान व्यक्त करत आहेत.
पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष
बारामती मद्ये खुलेआमपणे मटका सुरु आहे. अनेक पानाच्या टपऱ्यांवर पानपट्टीचे कोणत्याची वस्तू विक्रीस नाही तरी देखील त्या टपरीत एक कागद वही घेऊन बसलेली व्यक्ती दिसते. या दृष्यावरूनच तेथे मटका सुरु असल्याचे सहज लक्षात येते त्यासाठी कोणाच्या तक्रारीची गरज नाही. तरी हे पोलिसांना दिसत नसल्याने पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
सांगवी, माळेगाव परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.
- नारायण शिरगांवकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी