लग्नाचा तगादा लावल्याने बारबालेची हत्या; मृतदेहाच्या चपलेवरून लावला आरोपीचा सुगावा
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 21, 2022 06:51 PM2022-12-21T18:51:30+5:302022-12-21T18:53:52+5:30
उर्वशी हिने लग्नाचा तगादा लावल्याने रियाज खान याने त्याचा मित्र इम्रान शेख याच्यासोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला होता.
नवी मुंबई : गाढी नदीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तिच्या मारेकरूंचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेच्या चपलेवरून पोलिसांनी हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मृत महिला कोपर खैरणेची राहणारी आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धामणी गाव येथे गाढी नदीच्या पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळून आला होता. १४ डिसेंबरला हा मृतदेह आढळून आल्यानंतर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात त्याची नोंद करून तपासाला सुरवात करण्यात आली होती. दरम्यान या महिलेचा गळा आवळून हत्या करून मृतदेह त्याठिकाणी टाकण्यात आला होता. मात्र तिची ओळख पटेल असे काही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते.
गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी तपास पथक तयार केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, हवालदार प्रशांत काटकर, दीपक डोंगरे, रणजित पाटील आदींचा समावेश होता. यावेळी त्यांना मृत महिलेच्या पायातल्या चपलेवरून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्या ब्रॅण्डची चप्पल विक्री होत असणाऱ्या दुकानांमध्ये चौकशी केली. यामध्ये वाशीतल्या दुकानातून ती चप्पल विकली गेलेली असल्याचे समोर आले.
यानंतर, त्यावेळचे सीसीटीव्ही मिळवून तिच्यासोबत आलेल्या संशयित तरुणाचा शोध पोलिसांनी सुरु केला. यादरम्यान तो तरुण कोपर खैरणेतल्या एका जिममध्ये येत असल्याची माहिती हाती लागताच शनिवारी त्याला ताब्यात घेतण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रियाज खान असे त्याचे नाव असून तो देवनारचा राहणारा आहे.
रियाजचे शिरवणे येथील सोना बारमधील बारबाला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (२७) हिच्याशी प्रेमसंबंध होते. उर्वशी हि कोपर खैरणेला रहायला होती, तर रियाज हा कोपर खैरणेतच जिममध्ये प्रशिक्षक आहे. उर्वशी हिने लग्नाचा तगादा लावल्याने रियाज खान याने त्याचा मित्र इम्रान शेख याच्यासोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार १४ डिसेंबरला तिला कारमध्ये बसवून गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह धामणी गावालगतच्या गाढी नदीत टाकला होता.
हा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र उर्वशीच्या चप्पलच्या आधारे गुन्हे शाखेने संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला.