"अमित शाह बोलतोय, निवडणुकीत तिकीट पाहिजेत तर पैसे पाठवा", माजी आमदाराला फसवणुकीचा आला कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:42 AM2024-02-16T11:42:11+5:302024-02-16T11:42:37+5:30
एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगत माजी आमदाराला फोन केला.
बरेली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. पक्षांकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामध्ये भाजपाकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फेऱ्याही उमेदवारांनी सुरू केल्या आहेत. शिफारशींची फेरीही सुरू झाली आहे. यादरम्यान, काही फसवणूक करणारेही सक्रिय झाले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथून समोर आला आहे.
येथील एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगत माजी आमदाराला फोन केला. तसेच, लोकसभा निवडणुकीचे तिकीट हवे असेल तर पैसे पाठवा, असे त्याने फोनवर सांगितले. यानंतर माजी आमदार काहीसे सावध झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि एकाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण क्षेत्र) मुकेश चंद्र मिश्रा म्हणाले की, बरेलीच्या नवाबगंज पोलीस ठाण्यात निरीक्षक विनोद कुमार यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असे भासवून एका टोळीचे सदस्य तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली राजकारण्यांना फोनवरून फसवतात, असे सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, नवाबगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील समूहा गावातील रहिवासी रवींद्र मौर्य याने माजी आमदार किशनलाल राजपूत यांच्याशी ४ जानेवारी आणि २० जानेवारी २०२४ रोजी नऊ वेळा फोनवर बोलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोतयागिरी करून मी त्यांच्याशी बोललो आणि माजी आमदाराकडून तिकीटाचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असे रवींद्र मौर्य याने सांगितले. ट्रू कॉलर ॲपवर नंबर तपासल्यावर केंद्रीय गृहमंत्री, केंद्र सरकारच्या नावाचा आयडी दिसत होता. तसेच, मुकेश चंद्र मिश्रा सांगितले की, पोलिस तपास करत असल्याचे रवींद्र मौर्य याला समजल्यावर त्याने सिम तोडले. तसेच, ज्या क्रमांकावरून माजी आमदारांना कॉल करण्यात आला होता, तो क्रमांक रवींद्रच्या गावातील हरीश नावाच्या व्यक्तीच्या आयडीवर नोंदवला गेला आहे.
दोन आरोपींचा तपास सुरू
या प्रकरणी हरीशला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की, हे सिम त्याने 29 डिसेंबर 2023 रोजी त्याच्या आयडीवरून खरेदी केले होते. काही वेळाने गावातील रवींद्र मौर्य आणि शाहिद यांनी त्याला धमकावून सिम हिसकावले होते. पोलीस रवींद्र आणि शाहिदचा शोध घेत आहेत. तसेच, असा फसवा फोन कोणाला आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले.