दुचाकी लावण्याच्या वादातून जवानास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:36 AM2019-05-20T05:36:50+5:302019-05-20T05:36:52+5:30
मुंबई : : टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळ दुचाकी लावण्यास विरोध केला, म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर ...
मुंबई : : टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळ दुचाकी लावण्यास विरोध केला, म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर आव्हाड (३०) यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (३१), इरफान अब्दुल अजिज अन्सारी (२८) या दोघांना अटक केली आहे.
आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टिळकनगर स्थानकात शुक्रवारी ते कर्तव्यावर होते. तेव्हा येथील तिकीट घराजवळ अब्दुल दुचाकी लावताना दिसून आला. आव्हाड यांनी त्याला विरोध केला.
याच रागात अब्दुलने त्यांचा गळा पकडत शिवीगाळ केली. त्यानंतर, त्याचे आणखीन तीन साथीदार तेथे धडकले. त्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. यात इरफानचाही समावेश होता. आरोपींमधील इरफान हा वकील आहे, तर अब्दुल हा रेल्वेत नोकरीला आहे. रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.