कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळीत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 10:48 AM2021-05-25T10:48:36+5:302021-05-25T10:51:43+5:30
Crime News : गुड्डू नामक व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
बार्शिटाकळी/अकोला : कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळी शहरातील हालुपुरा परिसरात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारीची घटना घडली. यामध्ये एका गटातील गुड्डू नामक व्यक्तीने गोळीबार केला असून, यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर घटनास्थळावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नऊ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत आरोपींविरुद्ध बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राप्त माहितीनुसार, बार्शिटाकळी शहरातील हालुपुरा परिसरात कापूस खरेदी विक्रीच्या व्यवसायादरम्यान सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गुड्डू राज आणि अब्दुल रहेमान (५०) या दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. पाहता पाहता दोन व्यक्तीतील हे वाद दोन गटातील हाणामारीत झाले. घटनेत वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, गुड्डू नामक व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. यामध्ये अ. साकीब अ. गफ्फार (वय १९), शे. नदीम शे मुनीर (२५) आणि रस्त्याने जाणाऱ्या पाहुणी म्हणून आलेल्या महिलेचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बार्शिटाकळी पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. सद्य:स्थितीत घटनास्थळावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश
सूत्रांच्या माहितीनुसार, हाणामारी प्रकरणातील काही आरोपी हे अमरावती जिल्ह्यातील असून, यापूर्वी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माेनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस, पिंजर ठाणेदार पडघन, विजय पाटील, पिंजरकर, दिनेश अघडते यांची उपस्थिती होती.
कडक पोलीस बंदोबस्त
घटनेनंतर हालुपुरा परिसरात आरसीपी प्लाटूनच्या तुकडीस पाचारण करण्यात आले. या प्रसंगी परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून, कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.