वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी बनावट मागासवर्गीय जात प्रमाणपत्राचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:55 AM2019-08-31T05:55:40+5:302019-08-31T05:55:47+5:30
मध्य प्रदेशातील कॉलेजमध्ये रचला सापळा, मुंबईसह राज्यभरात गुन्हे
मुंबई : राज्यभरातील एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मागासवर्गीय जातीची बनावट वैधता प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या डॉक्टरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. रुग्ण बनून पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका कॉलेजमध्ये सापळा रचून डॉ.अब्दुल वहाब हाजी दाऊद मिर्झा याला अटक केली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात ३, आग्रीपाडा पोलीस ठाण्यास २ त्याच्यासह, भोईवाडा, नागपाडा, सायन, खेरवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, तसेच धुळे येथील चाळीसगाव पोलीस ठाण्यासह कोल्हापूरच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथेही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याने अनेक विद्यार्थ्यांना मागासवर्गीय जातीची बनावट वैधता प्रमाणपत्रे दिली. प्रवेश प्रक्रियेदरम्यान संशय येताच या विद्यार्थ्यांचे बिंग फुटले आणि मिर्झाकडून हे प्रमाणपत्र बनवून मिळाल्याचे समोर आले. १० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा हा धंदा सुरू होता.
...आणि रुग्ण बनून ठोकल्या बेड्या
इंदोर येथील इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये तो कार्यरत असल्याची माहिती मिळताच, शुक्रवारी तपास पथक कॉलेजमध्ये दाखल झाले. तेव्हा मिर्झा तेथे नव्हता. याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक काझी यांनी पोलीस हवालदार पवार यांचा मुलगा असल्याचे भासवून, त्यांना छातीच्या संसर्गासाठी तातडीने उपचार उपलब्ध असल्याचा बनाव केला. याबाबत परिचारिकेकडून समजताच मिर्झा तेथे दाखल झाला. तपासणीदरम्यानच त्याला बेड्या ठोकल्या.
या पथकाची कामगिरी...
सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे यांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, सपोनि रियाझ काझी, पोलीस अंमलदार साहेबराव पवार, विलास शिंदे, मच्छिंद्र गावंड यांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या.