मनसैनिक आणि पोलिसात झटापट; मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:52 PM2019-08-24T20:52:41+5:302019-08-24T20:58:49+5:30
चार रस्त्यावर काही काळ तणाव
डोंबिवली - मानपाडा चार रस्त्यावरील रोडवरील दरवर्षी ज्या ठिकाणी नवनिर्माण दहिहंडी गोविंदा पथक फोडत होते त्या ठिकाणी मनसेच्या वतीने प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन हटाव बॅनर दहीहंडी लावण्यात आले होते, सर्वप्रथम परंपरा म्हणुन साधी दहिहंडी बांधुन तीची पुजा करण्यात आली. नंतर पोलीस बंदोबस्त व इव्हिएम हंडीला पोलिसांनी विरोध केला, परंतू महाराष्ट्र सैनिकांनी लपून छपून ईव्हीएम मशिनची प्रतिकात्मक हंडी लावण्याचा प्रयत्न केला असता पोलीस व मनसैनिकात झटापट झाली, त्यातच त्या इव्हिएम मशिनची हंडी ओढाताणीत मोडून गेली. त्यामुळे ईव्हीएम हंडी फोडूया हा मनसेचा उद्देश सफल झाल्याचे आम्हाला समाधान असल्याचे शहराध्यक्ष राजेश कदम म्हणाले. ती प्रतिकात्मक ईव्हिएम हंडी पोलिसांनी जप्त केली.
ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, मोदी सरकार हाय हायच्या घोषनांनी मनसैनिकांनी चार रस्ता दणाणून सोडला होता. देशात ईव्हीएम मशिन वापरावर प्रचंड नाराजी पसरली आहे.आगामी विधानसभा निवडणुकित मतदानासाठी त्या मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी अनेक राजकीय पक्षांकडून होत आहे. यंदा अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगली आणि कोकणात नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा नवनिर्माण दहीहंडी करणार नाही असा निर्णय घेतला होता. मात्र प्रतीकात्मक इव्हिएम मशीन दहीहंडी फोडू असे मनसेने निर्णय घेतला. आणि डोंबिवलीच्या चार रस्त्यावर शनिवारी दुपारी 12 वाजता हंडी बांधण्यात आली. तिथे पोलिसांचा वेढा जमा झाला भरपावसात ईव्हीएम हटाव देश बचाव अशा बॅनर सहित दहीहंडी बांधण्यात आली ईव्हीएम मशीन बांधन्याच्या वेळेस रामनगर पोलिसांनी विरोध करत मनसैनिकाना रोखले. काळे टीशर्ट घालून मनसैनिक गर्दीत स्पष्ट उठून दिसत होते. ईव्हीएम फायबरचे होते, ते तुटले. तसेच त्या घटनेत झटापट झाली असली तरी पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नसल्याचे कदम म्हणाले. तसेच ठरल्याप्रमाणे 2 लाख 51 हजार रुपये पुरग्रस्तांसाठी देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी मंदा पाटील, दिपिका पेडणेकर,सागर जेधे, मंदार हळबे,निलेश भोसले,दिपक शिंदे, विशाल बढे, संजीव ताम्हाणे, प्रथमेश खरात व मनसैनिक नागरिक उपस्थित होते.