Crime News: सावधान! चाळीस हजार गमावल्यानंतर खाते बंद करण्याच्या नादात ६ लाख घालवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:06 PM2021-10-06T21:06:45+5:302021-10-06T21:07:08+5:30
Crime News Satara: दिल्लीत मोबाइल गेला चोरीला: सैन्य दलातील जवानाचं जाॅइन्ट अकाऊंट झालं रिकामं
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सैन्य दलातील जवानाचा माेबाइल चोरीला गेल्यानंतर काही तासांतच अज्ञातांनी बॅंकेच्या अकाऊंटमधून ४० हजार रुपये काढले. आता आणखी पैसे जाऊ नयेत म्हणून पत्नीने खाते बंद करण्याच्या नादात तब्बल ६ लाख ४५ हजार रुपये सायबर चोरट्यांच्या घशात घालविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील नीलम सचिन साळुंखे (वय ३२) यांचे पती सैन्य दलात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी ते सुटीवर गावी आले होते. दरम्यान, सुटी संपल्यानंतर ते परत हजर होण्यासाठी गेले. दिल्ली येथे पोहोचल्यानंतर त्यांचा मोबाइल चोरीला गेला. काही वेळानंतर त्यांनी साताऱ्यात राहात असलेल्या पत्नी नीलम यांना दुसऱ्याच्या फोनवर फोन करून आपल्या खात्यातून पैसे गेले आहेत अथवा नाहीत याची माहिती घेण्यास सांगितले. त्यावेळी
दोनवेळा वीस हजार रुपये काढून घेतल्याचे लक्षात आले. याची माहिती नीलम यांनी पती सचिन यांना सांगितले असता त्यांनी नीलम यांना बँकेत जावून खाते बंद करण्यास सांगितले. मात्र, त्या दिवशी रविवार असल्यामुळे बँकेला सुटी होती. त्यामुळे नीलम या बॅंकेत गेल्या नाहीत. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अत्यावश्यक सेवा असलेल्या क्रमांकावर सपंर्क साधला अणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर समोरुन त्यांना 'ॲनी डेस्क' नावाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करुन घेण्यास सांगत पुढील प्रक्रिया करण्यास सांगितले. यावेळी नीलम यांनी बँक खात्याची सर्व माहिती त्यांना दिली. यानंतर मात्र, या दोघांच्या एकत्रित बँक खात्यातून दोन दिवसांत तब्बल ६ लाख ४५ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेवून फसवणूक केली असल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी नीलम साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.