हेअर ट्रान्सप्लांट करताय तर सावधान; सर्जरीनंतर ५० तासांनी पडलं हृदय बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:22 PM2019-03-11T14:22:43+5:302019-03-11T14:24:06+5:30

शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नसून डॉक्टरांनी औषधांच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. 

Be careful if doing hair transplant; The heart stopped after 50 hours of surgery | हेअर ट्रान्सप्लांट करताय तर सावधान; सर्जरीनंतर ५० तासांनी पडलं हृदय बंद 

हेअर ट्रान्सप्लांट करताय तर सावधान; सर्जरीनंतर ५० तासांनी पडलं हृदय बंद 

Next
ठळक मुद्देव्यावसायिक असलेल्या चौधरी यांनी गुरुवारी चिंचपोकळी येथील एका खाजगी रुग्णालयात केस उगवण्याची ५ लाखाची शस्त्रक्रिया केली होती. गुरुवारी तब्बल 15 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान चौधरी यांच्या घरातील कुटुंबीय त्यांच्या सोबत नव्हतं. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबई - आजकाल तरुण वयात देखील केसं गळणं आणि टक्कल पडतं ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यावर हेअर ट्रान्सप्लांट हा एक उपाय. मात्र, ही शस्त्रक्रिया एका पुरुषासाठी जीवघेणी ठरली आहे. या शस्त्रक्रियेनंतर ५० तासांनी एका पुरुषाचं हृदय बंद पडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नसून डॉक्टरांनी औषधांच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, साकीनाका येथे राहणारे श्रवण कुमार चौधरी (43) असं या मृत व्यक्तिचं नाव आहे. व्यावसायिक असलेल्या चौधरी यांनी गुरुवारी चिंचपोकळी येथील एका खाजगी रुग्णालयात केस उगवण्याची ५ लाखाची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून ते पवईतल्या हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांना भेटले. त्यांचा चेहरा आणि गळ्यावर सूज आली होती. ते पाहून  डॉक्टरांना ही एनाफिलॅक्सिस नावाची एक प्रकारची अॅलर्जी असल्याचा संशय आला. ही अॅलर्जी प्रतिजैविक असलेल्या औषधांमुळे उद्भवली असावी असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यामुळे चौधरी यांना त्वरित दाखल करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी चौधरी यांच्या हृदयाच्या तपासणीसाठी कार्डियोलॉजिस्टला देखील बोलविण्यात आला होतं. मात्र, त्याआधीच शनिवारी सकाळी पाऊणे सात वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्यावर 9500 केसांचं पुनर्रोपण करण्यात आलं होतं. गुरुवारी तब्बल 15 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान चौधरी यांच्या घरातील कुटुंबीय त्यांच्या सोबत नव्हतं. अशा शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला प्रतिजैविक आणि सलाईन दिलं जातं. त्यामुळे कधीकधी अशा प्रकारची अॅलर्जी येऊ शकते. सलाईन लावताना ते हातावर न लावता केसांजवळी भागात लावलं जातं. त्यामुळे जर रुग्ण पोटावर झोपला असेल तर सलाईनचं द्रव्य चेहऱ्याच्या दिशेने प्रवाहित होतं आणि चेहरा सुजतो. पण त्यामुळे कधीही मृत्यू होत नाही, असं पुनर्रोपण तज्ज्ञांचं मतं आहे.

चौधरी यांना प्रतिजैविकांच्या अॅलर्जीमुळे मृत्यू आला असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकारामुळे चौधरी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुलं (१२ ते १८ वयोगटातील ) आहेत. साकीनाका पोलीस याप्रकरणी चिंचपोकळी येथील हेअर ट्रान्सप्लांट केलेले रुग्णालय मान्यताप्राप्त आहे का की बेकायदशीर आहे याबाबत चौकशी करणार आहे. 

Web Title: Be careful if doing hair transplant; The heart stopped after 50 hours of surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.