सावधान ! OLX वरून खरेदी करताय तर अशा ठगांपासून राहा दक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 04:21 PM2019-02-01T16:21:06+5:302019-02-01T16:21:55+5:30
रोहित राजेंद्र कुमार धवन उर्फ अमीन (30) आणि रुनित जयप्रकाश शाह (35) या दोन आरोपींना अटक केली.
ठाणे - ठाणे पोलीस आयुक्तालयात ऑनलाईन फसवणुकीचे व सायबर क्राईमचे गुन्हे वाढत चालले असल्यामुळे त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले होते. त्यानुसार तपास सुरु असताना ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष 5 ला सायबर क्राईम करणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपी पकडण्यात यश आले आहे. रोहित राजेंद्र कुमार धवन उर्फ अमीन (30) आणि रुनित जयप्रकाश शाह (35) या दोन आरोपींना अटक केली.
कापूरबावड़ी पोलीस ठाण्यात काही जण olx या ऑनलाईन पोर्टलद्वारे गाड्या विक्री व खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करत असल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरक्षक जयराज रणवरे समांतर तपास करत होते. तपासादरम्यान, त्यांना एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये एक आरोपी आढळून आला. त्याआधारे त्यांनी रोहित राजेंद्र कुमार धवन उर्फ अमीन आणि रुनित जयप्रकाश शाह या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. रोहित वसई तर रुनित हा भाईंदर उत्तन येथे राहणारे आहेत.
या दोघांची चौकशी केली असता पोलीसांना आरोपी हे उच्चशिक्षित असून त्यांना व्यवसायामध्ये आलेल्या अपयशातुन त्यांनी युट्युबवर How to Make Easy Money या संदर्भात व्हिडीओ पहिले आणि नंतर त्यांनी फसवणुकीची एक योजना तयार केली. प्रथम त्यांनी OLX वर विक्रीला असलेल्या चारचाकी गाड्या शोधायला सुरुवात केली. त्यात ते गाडीवर लोन असलेल्या गाड्या शोधत व अशा गाड्या मिळाल्यावर संबंधित मालकाला संपर्क करताना बनावट सिमकार्ड वापरत तसेच स्वतःचे नावाचे आधार कार्ड, पॅनकार्ड सुध्दा बनावट बनवत असत. तसेच त्यांनी OLX वरून मोबाईल ही खरेदी केले होते. सिमकार्ड व मोबाईल वरून त्यांनी OLX वर वेगवेगळे अकाउंट ओपन करून ज्या गाड्यांवर बँकेचे लोन आहेत अशा कार खरेदी करत. गाडी खरेदी करताना गाडी मालकास स्वतःची खरी ओळख लपवून बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्ड देत आणि खोट्या नावाने अँग्रीमेंट करून कमीत कमी रुपयांमध्ये खोटे चेक देऊन गाडी खरेदी करत असत. त्यानंतर ज्या गाड्या खरेदी केल्या आहेत. त्याच गाड्यांचे दुसरे मॉडेल OLX वर शोधत आणि त्या गाड्यांचे स्मार्ट कार्ड, आरसीबुक व इतर कागद पत्रे डाऊनलोड करून त्या गाडीचे नंबर प्लेट कर्ज असलेल्या गाडीला लावत असत आणि त्यांच्या गाडीवर कर्ज असलेल्या गाडीचा इंजिन नंबर व चेसीस नंबर लावत असत व त्या गाड्या OLX वर ही दुकली विकायची. गाडी मालकाला दिलेला खोटा चेक वटत नसे व त्याची फसवणुक होत असे. दुसरीकडे बँकेची लोन रिकव्हरी करणारे त्यांच्यामागे लागत अशी फसवणूक झालेले गाडी मालक नंतर या दोघांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत. मात्र, त्यांचे सगळे कागदपत्र आणि मोबाईल नंबर बनावट असल्यामुळे ते मिळुन येत नव्हते. हे दोघेजण कॉम्पुटरमध्ये तरबेज असून ऑनलाईन व्यवहार करण्यास हुशार आहेत .
या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टोयाटो कंपनीची इटिओस लिव्हा ही गाडी मुळ नंबर Mh-04 5227 ही लोन असेलेली गाडी 70 हजार रुपयाला खरेदी करून त्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या जागेवर MH-04 HF-1155 हा नंबर प्लेट टाकुन ती गाडी 1 लाख ९६ हजार रुपयाला विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने या आधी अशीच टोयाटोची इटिओस गाडी 25 हजार रुपयाला विकत घेउन 3 लाख ७० हजार रुपयाला विकली असल्याचे सांगितले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे ठगांनी कबूल केले. आरोपीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. OlX वर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा आणि OLX वर व्यवहार करताना सतर्क राहून करावेत असे आवाहन पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी केले आहे.