सावधान! स्वस्तात सोनं देण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:08 PM2021-05-08T20:08:48+5:302021-05-08T20:10:36+5:30
Fraud Case : महाठग मुकेश सुर्यवंशीचा राज्यभरात कोटयवधीचा गंडा, पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई : राज्यभरातील शेतकरी, मोलकरणीसह उच्चशिक्षितानाही स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून कोटयवधीचा गंडा घालणारा मुकेश सुर्यवंशी अखेर पोलिसांच्या जाळयात अडकला आहे. मुंबईसह राज्यभरात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहे. यात तुमचीही फसवणूक झाली असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सुर्यवंशीने घाटकोपर तसेच वेगवगेळ्या ठिकाणी स्थापन केलेल्या कंपनीही बोगस असल्याचे समोर आले. त्याने दिलेले कागदपत्रे बनावट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सुर्यवंशीने स्वस्तात सोने खरेदी विक्री करण्याच्या नावाखाली ठग़ीचा धंदा सुरु केला. यात जास्तीचा नफा मिळणार असल्यामुळे अनेकांनी गुंतवणुक केली. मुंबईत खार आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
कॅनडा येथे नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये एजेंट म्हणून कार्यरत असलेले सत्यानंद गायतोंडे (५३) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची यात ६० ते ७० लाखांना फसवणूक झाली आहे. गायतोंडे यांचा मुंबईतील दहिसर भागात फ्लॅट आहे. ते अधून मधून मुंबईत ये जा करतात. गायतोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये मढ येथे एका सिनेमाच्या सेटवर त्यांची मुकेशसोबत ओळख झाली. तेव्हा त्याने मसाल्याचा व्यवसाय असून त्याची जे जे स्पाईसेस नावाची कंपनी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. फेसबुक, व्हाँँट्सअँँपवरून त्याच्याशी संवाद सुरु झाला.
२०१६ मध्ये मुंबईत आल्यानंतर मुकेशने संपर्क साधून मौर्या स्वीस नावाची कंपनी उघड़ली असून त्यात, बाजारभावापेक्षा १० टक्के कमी दराने सोने आणि त्याची पावती देणार असल्याचे सांगितले. हे सोने बाहेर विकल्यास त्यावर जास्तीचा नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवले. मात्र त्यांनी दुर्लक्ष करत ते कॅनडाला निघून गेले.
२०१८ मध्ये कामानिमित्त पुन्हा मुंबईत आल्यानंतर मुकेशने त्यांची भेट घेतली. आणि बंगलोरमध्ये सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी मदत मागितली. मुकेश ओळखीचा असल्याने त्यांनी विश्वास ठेवून मदत केली. २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान गायतोंडे यांनीही १५ लाख ६२ हजार रूपयांची गुंतवणुक केली. कुटुंबियांनीही पैसे गुंतविले. पैसे देऊनही सोने न दिल्यामुळे त्यांनी मुकेशकड़े विचारणा करताच त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
अशी केली अटक
तीन वर्षाने तो पुन्हा भारतात येणार असल्याची माहिती गायतोंडे यांना मिळाली. त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांना याबाबत सांगून त्यांनी पाठपुरावा केला. मुकेशला गोवा विमानतळावर ताब्यात घेतले. तेथून पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत तेथे दाखल गुह्यांत अटक केली. पुढे खार आणि त्यापाठोपाठ सांताक्रुझ पोलिसांनी त्याचा ताबा घेत त्याला बेडया ठोकल्या. सध्या तो न्यायालयीन कोठड़ीत आहे.
मुंबईत फसवणूक करत मुकेशची दुबईवाऱी
गायतोंडे यांनी फसवणूक झाल्यानंतर २०१९ मध्ये तेव्हाच्या मुंबई पोलीस दलातील एका सहआयुक्तांची भेट घेतली. त्यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी सध्या एटीएसमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला भेटण्यास सांगून तो मदत करेल असे सांगितले. मात्र संबंधित अधिकाऱ्याने असेच २५ दिवस घालवले. पुढे त्यांनी खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेव्हाही तपास अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे मुकेश दुबईला पसार होण्यास यशस्वी झाला असाही आरोप त्यांनी केला. मात्र यावेळी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे मुकेश जाळयात अडकला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गुजरातमध्ये लग्नाचे आमीष दाखवून गंडा...
मुकेशने गुजरातमध्ये लग्नाचे आमीष दाखवून तरुणीची फसवणूक केल्याची माहितीही समोर येत आहे.
उच्च राहणीमान पाहून शेतकरीही फसले...
उच्च राहनीमान, ऑडीतून ये जा करत असल्यामुळे शेतकरी भुलले आणि ठगसेन मुकेश सुर्यवंशीच्या जाळयात अडकले. यात, भविष्यात मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी ठेवलेले पैसे अडकले तर कुठे वृद्धापकाळासाठी ठेवलेली जमापूंजी गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मुकेश मुळे मानसिक तणावात गेलेल्या शेतकऱ्यांना आता न्यायासाठी लढण्याची ईच्छाही राहिलेली नसल्याचे यात फसलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
धुळ्यातील एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश आणि त्याच्या आई वडिलांच्या राहणीमान पाहून ते आपली फसवणूक करणार नाही असे वाटले होते. ५ तोळे सोन्यावर गुंतवणुक केल्यास ते पैसे दुप्पट करून देण्याचे आमीष दाखवले. अशात सुरूवातीचे तीन महीने गुंतविलेल्या रक्कमेप्रमाणे हफ्ते मिळू लागले. त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास आणखीन घट्ट झाला. यात, एकाने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे दुप्पट होवून मिळतील, जेणेकरून मुलीचे थाटात लग्न करू म्हणून गुंतवणुक केली. एका सैन्य दलातील निवृत्त जवानाने त्याची जमापूंजी त्यात गुंतवली. तर काहीनी कर्ज घेत पैसे जमा केले.
मात्र, मुकेश शेतकऱ्यांना आणखीन कर्जाच्या ओझ्याखाली टाकून नॉट रिचबेल झाला. दुबईला पसार होण्यापूर्वीपर्यंत तो सगळे पैसे मिळणार असल्याचे आश्वासन देत होता. मात्र नंतर त्याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. त्याचे आई वडीलही गायब आहेत. तो रोख स्वरुपात पैसे घेत असल्यामुळे अनेकांकड़े पुरावे नाही. अशात नातेवाईकांच्या ओळखीतून व्यवहार केल्यामुळे लेखी करारही जवळ नाही. त्यामुळे सध्या कोर्ट कचेरीचा खर्चही पेलवू शकत नसल्यामुळे पुढे येण्याची भिती वाटत असल्याचे ते सांगतात. सध्या झाला तेवढा मनस्ताप पूरे म्हणत कोणीही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
६० हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक?
मुकेशने धूळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील ६० हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा संशयही शेतकऱ्यांकड़ून वर्तविण्यात येत आहे. सध्या यापैकी २० ते २५ जण संपर्कात आहे. मात्र सगळेच मानसिक धकक्यात आहेत. कोरोनामुळे अनेकांवर दुसऱ्यांच्या शेतात जावून काम करण्याची वेळ ओढावली असल्याचे धुळ्यातील शेतकऱ्याने सांगितले.
मुकेशवर कठोर कारवाई होणे गरजेचे
मुकेशविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अशात तक्रारदारांनीही पुढे यायला हवे, जेणेकरून दुसरा मुकेश उभा राहू नये, असे तक्रारदार सत्यानंद गायतोंडे यांनी सांगितले. गायतोंडे यांच्या प्रयत्नामुळे मुकेश पोलिसांच्या हाती लागला. यात, गायतोंडे आणि त्यांच्या कुटुंबियांची ६० ते ७० लाखांना फसवणूक झाली आहे.
पुण्यातील महिलेला ४३ लाखांचा गंडा...
पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणार्या मुकेश सूर्यवंशी याने पुण्यातील एका महिलेला तब्बल ४३ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला होता. पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत काढलेल्या लुकआऊट नोटिशीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडू शकला आहे.
ठाण्यातील दोन महिलांचीही ८ लाखांना फसवणूक
ठाणे: सोन्याच्या मोबदल्यात बाजारभावापेक्षा जादा रक्कम मिळवून देतो, असे अमिष दाखवून मुकेश सूर्यवंशी (35) ठाण्यातील एका महिलेकडून साडे तीन लाखांचे सोने घेतले. तर अन्य एका महिलेला स्वस्तात सोने देतो, असे सांगून तिच्याकडूनही पाच लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात या दोघींचीही फसवणूक झाली. दोघींनाही त्याने पैसे किंवा सोनेही परत न केल्यामुळे याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
काय आहे मागणी?
पाचपाखाडी (ठाणो) येथील महिलेला २०१३ मध्ये घर घ्यायचे होते. त्यामुळे तिला काही पैशांची निकड होती. बॅकेतून कर्ज घेण्यात अनेक अडचणी येतात, असे तिचे म्हणणो होते. त्यात मुकेशने तिला जादा दराने सोने विकून देतो, असे सांगितले. मोठी स्वपAे दाखविली. त्याच्या भूलथापांना बळी पडून तिने त्याच्याकडे साडे तीन लाखांचे साडे सात तोळे सोने सोपविले. आता किमान हे सोने परत मिळावे. त्यानंतर त्याच्या अन्यही साथीदारांची पोलिसांकडून चौकशी केली जावी, अशी अपेक्षा या महिलेने व्यक्त केली आहे. वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल बजबळे आणि वरिष्ठ पेालीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी तक्रार दाखल करण्यापासून ते तपासार्पयत बरीच मदत केली.
महिलांनो अमिषाला बळी पडू नका-
पुणे, अहमदाबाद येथील विवाहित महिलांना तर त्याने मुलांसहित स्वीकारण्याचे लग्नासाठी अमिष दाखवून त्यांनाही लाखो रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणी फेसबुकद्वारे लगAाचे, प्रेमाचे अमिष दाखवून किंवा सोने अल्प दरात देण्याचे अमिष दाखवित असेल तर कोणीही अशा अमिषाला बळी पडू नका. ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी तक्रारीसाठी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन ठाणो पोलिसांनी केले आहे.