सावधान! तुमचीही होईल फसवणूक; आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 09:18 PM2018-08-03T21:18:57+5:302018-08-03T21:20:22+5:30
फेक मेसेपासून सावध रहा; महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून नागरिकांना आवाहन
मुंबई - तुमच्या आयकर रिफंडची रक्कम मंजूर झाली असून ती तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफरकरण्यासाठी तुमचा बँक खाते क्रमांक आम्हाला पाठवा. खाते क्रमांक चुकीचा असला तर खाली दिलेल्या लिंकला व्हिजीट करा असा एसएमएस तुमच्या मोबाईलवर आला तर सावधगिरी बागळा. कारण आयकर खात्याचे बनावट पेज बनवून संगणकीय प्रणालीने आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय झाली असून त्यापासून सावधगिरी बाळगा असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नागरिकांना केले आहे.
आयकर खात्याचे बनावट पेज बनविणारी गुन्हेगार टोळी आयकर धारकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून लुटत असल्याचे पोलिसांच्या सायबर सेलने आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. आयटी रिटर्न भरण्याची पहिली डेडलाईन संपल्यावर ही टोळी सक्रिय झाली आहे. टोळीचे लुटारू आयकर रिफंडबाबत माहिती मिळवून आयकरधारकांना मोबाईलवर आपला आयकर रिफंड मंजूर झाला आहे. तो तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचा तपशील द्या किंवा मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा असे मेसेज पाठवत आहेत. आपण त्या लिंकला भेट दिल्यास आणि लुटारुंच्या सांगण्यानुसार बँक खात्याचा तपशील दिल्यास ते त्या माहितीवरून आपली आयकर रिफंडची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून नागरिकांना लुटत असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी दिली आहे.