मारहाण करून व्यावसायिकाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:41 AM2019-08-15T03:41:27+5:302019-08-15T03:41:39+5:30
नेरुळ रेल्वेस्थानकाबाहेर व्यावसायिकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे.
नवी मुंबई : नेरुळ रेल्वेस्थानकाबाहेर व्यावसायिकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाच्या कारमध्ये घुसलेल्या व्यक्तीने स्वत:कडील पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांच्या झटापटीत ते पिस्तूल बनावट असल्याचे उघड झाले.
हेमंत गुप्ता (४८) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते नेरुळचे राहणारे असून, नेरुळ रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्ये त्यांचा कम्प्युटर पार्ट्सच्या विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दररोज जमा होणारी रक्कम सोबत घेऊन ते घरी जातात. त्यानुसार सोमवारी रात्री ते व्यवसायातून जमा झालेली ८६ हजार रुपयांची रोकड घेऊन घरी चालले होते. या वेळी ते पार्किंगमधील कारमध्ये जाऊन बसले असता, एक अनोळखी व्यक्ती कारमध्ये घुसली. त्याने पोलीस असल्याचे सांगून सोबत पोलीसठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, गुप्ता यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने स्वत:कडील पिस्तूल काढून गुप्ता यांना धमकावत पैशाची मागणी केली. या वेळी गुप्ता यांनी पैसे नसल्याचे सांगत त्याला प्रतिकार केला. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने पिस्तूलच्या दांडक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली असता, ते बनावट असल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी सदर व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्याकडील पिस्तूलचे दोन भाग होऊन ते कारमध्येच पडले. त्याच वेळी सदर व्यक्तीने गुप्ता यांच्याकडील रोकड घेऊन अंधारात पळ काढला. या घटनेप्रकरणी त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली असता, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेमंत गुप्ता हे दररोज सोबत रोकड बाळगत असल्याची माहिती मिळवून त्यांना लुटण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार नेरुळ पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.