खंडणी देत नसल्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:47 PM2019-04-01T15:47:27+5:302019-04-01T15:48:32+5:30
खंडणी देत नसल्याने एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केली.
पिंपरी : खंडणी देत नसल्याने एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील यशवंतनगर चौकातील केजीएन टायर्स सेंटर येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ डेंगळे (वय ४०, रा. यशवंतनगर, पिंपरी) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी छोटू कुमार श्रीबनवारी राम (वय १९, रा. यशवंतनगर चौक, टेल्कोरोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी डेंगळे हा काही दिवसांपूर्वी फिर्यादी छोटू यांच्या पिंपरीतील टेल्को रोड येथील यशवंतनगर चौकातील केजीएन टायर्स सेंटर या दुकानात आला होता. तुला येथे धंदा करायचा असेल तर मला महिन्याला पैसे द्यावे लागवतील असे डेंगळे फिर्यादीला म्हणून तेथून निघून गेला. त्यानंतर पुन्हा डेंगळे साथिदारांसह टायरच्या दुकानात आला. तु मला महिन्याला पैसे का देत नाही असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करु लागला. त्यावेळी फिर्यादीने मालकाकडून पैसे घ्या, असे सांगितले असता याचा राग आल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन लोखंडी रॉडने पाठीत व उजव्या हातावर मारुन जखमी केले. दरम्यान, फिर्यादीच्या ओळखीचे रामशंकर गुप्ता हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या पट्याने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.