रजा नाकारली म्हणून महावितरण कंपनीच्या अभियंत्याला लोखंडी रॉडने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 03:48 PM2019-08-29T15:48:08+5:302019-08-29T15:55:09+5:30
माझं कोण काही वाकडे करु शकत नाही, अशी दमदाटी करुन हातातील लोखंडी रॉडने शरीरावर लोखंडी रोडने मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे.
खेड : रजा देण्यास नाकारली म्हणून महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याबाबत महावितरणमधील वरिष्ठ यंत्रचालक बाळकृष्ण नागु पालेकर (रा. वाडा ता. खेड ) यांच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सदाशिव बोरचटे (वय ३३ ) रा.पडाळवाडी ( ता.खेड ) यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मौजे वाडा (ता.खेड) गावच्या हद्दीत महावितरण कार्यालयात ही घटना घडली आहे.
वाडा येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ यंत्रचालक बाळकृष्ण नागु पालेकर यांनी कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर बोरचटे यांच्या कार्यालयात जाउन मला घरगुती अडचण असल्यामुळे मला दहा दिवसांची रजा पाहिजे अशी विचारणा बोरचटे यांना केली. याबाबत कनिष्ठ अभियंता बोरचटे यांनी पालेकर यांना सांगितले की, आपले कार्यालय ग्रामीण भागात असून पावसाळी दिवस आहेत. तसेच तुमच्या सुट्टीच्या दिवसात गणपती उत्सव आहे. तुमच्या अगोदरच शनिवारी दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अगोदर तुमची रजा मंजूर करता येणार नाही. तरीपण मी तुमच्या रजेचा अर्ज वरिष्ठांना देतो, असे म्हणल्या कारणांवरुन पालेकर यांनी ऑफिसमधील एक लोखंडी रॉड हातात घेवुन बोरचटे यांच्याजवळ जाऊन तुच माझी जाणुन बुजुन रजा मंजुर करत नाही, माझं कोण काही वाकडे करु शकत नाही, अशी दमदाटी करुन हातातील लोखंडी रॉडने शरीरावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता बोरचाटे यांनी खेड पोलीस ठाण्यात पालेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील पोलीस हवालदार एल. गिजरे करीत आहे.