खेड तालुक्यात खांबाला बांधून एकाला जबर मारहाण ; १५ ते २० जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:16 PM2018-10-19T21:16:55+5:302018-10-19T21:19:10+5:30
भांबोली गावात वीज वितरणच्या कार्यालयासमोर मारुती हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता.
आंबेठाण : भांबोली (ता. खेड) गावच्या लगतच्या वासुलीफाटा येथील औद्योगिक भागात रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीचालकांना धक्का देऊन मुद्दाम पाडणाऱ्या व चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्या काचा फोडणाऱ्याला काही जणांनी एकत्र येऊन लोखंडी खांबाला बांधत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आंबेठाण,भांबोली येथील जितू गायकवाड,साहिल गायकवाड, शेखर महेश नाईकनवरे, साहिल दिलीप नाईकनवरे, पिंट्या पानमंद, उत्तम पानमंद, मयूर बुट्टे, भाऊ (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह अन्य १५ ते वीस जणांच्या विरोधात गंभीर मारहाण केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली गावात वीज वितरणच्या कार्यालयासमोर मारुती राघोजी बळे (वय ३२, रा. माळी वेताळ महात्मा फुले चौक, मालेगाव, जि. नाशिक) हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता. यासाठी गावातील नागरिकांनी त्याला विरोध केला.त्यानंतर काही युवकांनी मारुती याला लोखंडी खांबाला बांधत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. चाकण पोलीस तपास करत आहेत.