संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 12:23 PM2021-08-04T12:23:31+5:302021-08-04T12:47:08+5:30
Crime News : पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडीयावरून या घटनेला वाचा फोडली.
कल्याण - कल्याण नजीक असलेल्या मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला जाणं तरुण तरुणींना चांगलच महागात पडलं आहे. तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत 6 ते 8 टवाळखोर मुलांनी सर्वांना बेदम मारहाण करत दोन तरुणींचा विनयभंग केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वताची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली.
मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही असे येथील पोलिसांनी त्यांना सांगितले. मात्र यातील पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाज कंटकावर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वताच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीला वाचा फोडल्यावरच पोलीस प्रशासन नेहमी का जागे होते? हा देखील एक विषय आहे.
विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथक आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आले आहेत. तसेच वर्णन केल्यानुसार आरोपींचे स्केच देखील बनवण्यात येत आहेत.
- विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त