जनावरांच्या डॉक्टरांना गुरासारखी मारहाण; तीन पोलीसांसह एका होमगार्ड निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:44 PM2022-03-11T15:44:58+5:302022-03-11T16:17:29+5:30
Assaulting Case : या प्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीसांसह एका होमगार्डला पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी निलंबित केले आहे. पोलीसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ अधिष्ठात्यांसह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात आंदोलन केले.
शिरवळ - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ अंतर्गत शिरवळ ता. खंडाळा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैदयकीय महाविदयालयाच्या वसतिगृहामध्ये विदयार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीसांसह एका होमगार्डला पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी निलंबित केले आहे. पोलीसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ अधिष्ठात्यांसह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी, शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील मुलांना शिरवळ पोलीसांमधील तीन पोलीस कर्मचारी आणि एका होमगार्डने मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करत बसले असताना त्यांना विनाकारण मारहाण करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तर स्थानिक रहिवाशांनी विद्यार्थ्यांबाबत तक्रार केल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. मात्र, अशा प्रकारे मारहाण करणे हे योग्य नसल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तीन पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असे चार जणांना निलंबित केले आहे.
याबाबत, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, खंडाळा तहसिलदार दशरथ काळे, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी विदयार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतू विदयार्थी ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नसून बैठकही निष्फळ ठरली आहे. पोलीसांना बडतर्फ करण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत.