आरोपीच्या मागावर असलेल्या तेलंगणा पोलीसांना मारहाण;ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 05:34 PM2019-11-04T17:34:54+5:302019-11-04T17:37:47+5:30
स्थानिक पोलीस प्रशासनाला पूर्वकल्पना न देता ताब्यात घेणे तेलंगणा पोलिसांना पडले महागात
सेनगाव : तेलंगणा येथून 420 च्या गुह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना अपहरणकर्ते समजून शेगांव खोडके येथील ग्रामस्थांनी मारहाण करत तब्बल सहा तास डांबून ठेवले. तसेच हिंगोलीपोलिस दलाच्या चारचाकी वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांवर 353 सह अन्य कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि.3 नोव्हेंबर रविवार रोजी तेलंगणा येथून पोलीस पथक अपराध क्र.235/19 कलम 420,417,34 आयपीसी मधील आरोपीचा मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेण्यासाठी सेनगाव तालुक्यातील शेगांव खोडके येथे आले होते. रात्री ११ वाजेच्या दरम्यान त्यांनी संशयीत आरोपी म्हणून एका व्यक्तिला ताब्यात घेत गाडीत बसवले. मात्र गांवकऱ्यांना त्यांच्यावर अपहरण करीत असल्याचा संशय आला. यामुळे ग्रामस्थांनी त्यांना अडवले आणि त्यांना मारहाण करत एका खोलीत तब्बल सहा तास डांबुन ठेवले.
दरम्यान, रिसोड-वाशिम-गोरेगांव-सेनगाव-हिंगोली पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून गांवकऱ्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र विदर्भातील पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याने ग्रामस्थांनी रागाच्या भरात दगडफेक केली. यानंतर हिंगोलीमधून पोलिसांची कुमक बोलावून तेलंगणा पोलिसांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली. गोरेगांव पोलिसांनी शेगांव खोडके येथील राजू खोडके, संतोष खोडके, रिसोड येथील आतीक तसेच म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड, उर्मिला गणेश गायकवाड व इतरांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी 208/19 नुसार कलम 353,332,143,147,148,149,152 भादवी सह तीन सार्वजनिक नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.