जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांना मारहाण, दोन आंदोलकांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: September 26, 2023 03:38 PM2023-09-26T15:38:46+5:302023-09-26T15:39:06+5:30
याप्रकरणी संबंधित आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी आलेल्या दोन आंदोलकांनी महिला पोलिस उपनिरीक्षक तसेच एका महिला पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा शंकर खोत, ओंकार शंकर खोत (रा. शाहूनगर गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शोभा खोत आणि ओंकार खोत हे दोघे सोमवार, दि. २५ रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भिंतीला ‘आमरण उपोषण’ असे लिहिलेला फलक ते लावत होते. त्यावेळी हा फलक लावण्यास पोलिसांनी विरोध केला.
सहायक पोलिस निरीक्षक केनेकर यांना त्यांनी अरेरावीची भाषा केली. तर शोभा खोत या शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्या. महिला पोलिस शहनाज शेख व महिला पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनी त्यांना विरोध केला असता संबंधितांनी त्यांना हाताने मारहाण केली. तर शोभा खोत यांनी जोरजोरात ओरडून पोलिसांविषयी अपशब्द वापरले. या प्रकारानंतर महिला पोलिस शहनाज शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पालवे या अधिक तपास करीत आहेत.