Crime News: तांत्रिक सल्लागार बनला लुटारू, ७५ कोटींंचे बिटकॉईन केले लंपास, अलिशान घरे, गाड्यांची केली खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:03 PM2022-03-25T23:03:09+5:302022-03-25T23:03:27+5:30
Crime News: आभासी चलनाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मदत घेतलेल्या केपीएमजी कंपनीचा भागीदार व माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल ७५ कोटी रुपयांचे २४० आरोपीकडील बिटकॉईन लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पुणे - आभासी चलनाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मदत घेतलेल्या केपीएमजी कंपनीचा भागीदार व माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल ७५ कोटी रुपयांचे २४० आरोपीकडील बिटकॉईन लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी ६ कोटी रूपयांचे बिटकॉईन व इतर चलन जप्त केले आहेत. तर काही बिटकॉईन त्याचा भाऊ व पत्नीच्या नावावर वळविल्याचे दिसून आले आहे.
देशभरात गाजलेल्या बिटकॉईन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात सायबर तज्ज्ञ म्हणून पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) यांची नेमणूक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात त्यावेळी अटक केलेल्या आरोपींकडील डेटाचा गैरवापर करून या दोघांनी परस्पर स्वतः बिटकॉईन घेतल्याचे आढळून आले आहे. पाटील याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आतापर्यंत २४० बिटकॉईन घेतल्याचे आढळून आले आहे.
पाटील याने या बिटकॉईनच्या रक्कमेतून ६ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच त्यातून काही आलिशान गाड्यांची खरेदी केली असून ही मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
पाटील याने गैरमार्गाने घेतलेले काही बिटकॉईन त्याची पत्नी व भाऊ यांच्या नावावर पाठविल्याचे दिसत आहे. ते बिटकॉईन जप्त करण्यासाठी त्याचे गोपणीय क्रमांक पत्नीला माहिती असल्याचे तो सांगत आहे. पण, त्याची पत्नी कांचन पाटील व भाऊ अमरनाथ पाटील यांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी पंकड घोडे याने देखील काही बिटकॉईन घेतल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले आहे. मात्र तो तपासात पोलिसांना सहकार्य करत नाही. त्याच्याकडे सापडलेल्या डेटांचे विश्लेषण सुरू आहे.
कंपनीचा नोकर ते भागीदार
तपासात अथवा इतर कामांसाठी सायबर तज्ज्ञ पुरवणारी केपीएमजी कंपनी आहे. २०१८ मध्ये माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हा या कंपनीत नोकरी करत होता. त्या कंपनीच्या वतीनेच त्याची बिटकॉईन फसवणूक प्रकरणात पोलिसांना मदत करण्यासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण, या गुन्ह्यानंतर तो कंपनीचा भागीदार झाल्याचे आढळून आले आहे