वेटर, मॅनेजर बनून पोलिसांनी ठोकल्या सराईत सोनसाखळी चोराला बेडया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 10:11 PM2021-09-03T22:11:45+5:302021-09-03T22:12:18+5:30
Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाला घाटकोपरमध्ये ३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करत पंतनगर पोलिसांनी तपास सुरु केला.
मुंबई : हॉटेलमध्ये वेटर आणि मॅनेजर बनून सराईत सोनसाखळी चोराला पंतनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. या कारवाईत महंमद हुसेन हाजी हनिफा हाकम (३३) आणि हैदर अली शेर अली सारंग ( ३२ ) या दोघांना गुरूवारी अटक करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून ७ गुन्हे उघड़कीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाला घाटकोपरमध्ये ३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करत पंतनगर पोलिसांनी तपास सुरु केला. तांत्रिक तपासात गुह्यांत वापरलेली दुचाकी साकीनाका परिसरातील पे अँड पार्किंग याठिकाणी पार्क असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साध्या गणवेशात सापळा रचला. पुढे आणखीन एका दुचाकीबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. मोटरसायकल क्रमांक तसेच चलान वरून मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक तपास करून यातील एका आरोपीला पोलिसांनी पकड़ले. तसेच दुसरा आरोपी अंधेरीतील केएफसी चिकन सेंटर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेटर आणि मॅनेजर बनून आरोपीला अटक केली.
या कारवाईत महंमद हुसेन हाजी हनिफा हाकम (३३) आणि हैदर अली शेर अली सारंग ( ३२ ) या दोघांना अटक करण्यात आले आहे. हाकम हा पायधुनीचा तर सारंग हा चिंचबंदर परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या चौकशीतून साकीनाका, घाटकोपर, व्ही. बी नगर, विलेपार्ले, कुर्ला, मानखुर्द, पंतनगर पोलीस ठाण्यातील ७ गुन्हे उघड़कीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांकडे अधिक तपास सुरु आहे.