बीडमध्ये नशेच्या गोळ्या, औषधी पकडली; २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कामगिरी
By अनिल भंडारी | Published: May 15, 2024 10:10 PM2024-05-15T22:10:47+5:302024-05-15T22:11:35+5:30
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीड: पोलिसांना पाहताच विक्रीसाठी आणलेल्या नशेसाठीच्या गोळ्या,औषधी जागेवरच सोडून तरूणाने पळ काढल्याची घटना शहराच्या जुना बाजार भागात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरामध्ये औषधी, गोळ्या नशेचे द्रव्य म्हणून विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले होते.
दरम्यान शेख नासीर शेख बशीर नामक इसम जुना बाजार भागामध्ये गुपचूपपणे नशेच्या गोळ्या आणि औषधी विकत आहे आणि तो नॅशनल उर्दू स्कूलसमोर मुद्देमाल घेऊन थांबल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने शहर ठाण्याच्या पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहून मुद्देमाल जागेवरच सोडून तो पळून गेला. छापा टाकण्यासाठी औषध निरिक्षक जीवन दत्तात्रय जाधव बीड यांची मदत घेण्यात आली आणि त्यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलिस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, मनोज परजणे, अशफाक सय्यद, शहेनशहा सय्यद, अयोध्या डोके, सुशेन पवार यांनी केली.
कुठून आणली गोळ्या, औषधी ? पोलिस करणार तपास
या कारवाईत अल्प्राझोलम आणि कोडींग फॉस्फेट नावाचे खोकल्याचे औषध असलेला साठा जप्त करण्यात आला. पाच हजारपेक्षा जास्त गोळ्या आणि शंभरपेक्षा जास्त बाटल्या खोकल्याच्या समाविष्ट होत्या. जवळपास २६ हजार रूपयांचा हा मुद्देमाल आहे. ही औषधी कोठून आणली याचा शोध घेण्यात येणार असून ज्यांनी ही औषधी पुरवली त्यांनाही प्रमुख आरोपी करण्यात येणार आहे. तसेच यास मदत करणारे सर्वांना आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.