Crime News:जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांवर तलावरीने वार, एक गंभीरावस्थेत औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 02:56 PM2022-02-27T14:56:02+5:302022-02-27T14:57:15+5:30
या घटनेतील आरोपी फरार असून, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे जखमी तरुणाच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होणार आहे.
गेवराई : बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे जुन्या भांडणाची कुरापत काडून शनिवारी मध्यरात्री १च्या सुमारास झोपेत असलेल्या व्यक्तीवर तिघांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्यात उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. यातील आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात शनिवार रोजी झोपलेला असताना मध्यरात्री एकच्या सुमारास भावकितील शेख रईस शेख इसुफ ,शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे आले आणि त्यांनी समीरवर झोपेत असताना तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.
या घटनेमध्ये समीरच्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर सुध्दा गुढग्यावर वार झाले आहेत. ही घटना रात्री सिरसदेवी येथील बेडकी या ठिकाणी घडली असून शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर समीरला जखमी अवस्थेत उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने समीर याला औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जवाब घेण्यासाठी आमचे पोलिस औरंगाबाद येथे निघाले आहेत. जवाब घेतल्यानंतर वाद कशाने झाला, आरोपी किती होते, याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल होइल.