बीड जिल्हा रुग्णालयात शिकाऊ विद्यार्थिनीची कर्मचाऱ्यांकडूनच छेड; नातेवाईकांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:01 PM2020-06-05T17:01:59+5:302020-06-05T17:02:22+5:30
प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची रुग्णालयात कार्यरत असणाऱ्याच एका कर्मचारी छेड काढली. या विद्यार्थिनीने याची रितसर तक्रार गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे केली होती.
बीड : अपघात विभागात कर्तव्य बजावणाऱ्या मेडिकलच्या शिकाऊ विद्यार्थिनीची येथीलच एका कर्मचारी छेड काढली. याबाबत रितसर तक्रारही केली होती. परंतु शुक्रवारी दुपारी अचानक नातेवाईकांनी येऊन या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. दोघांच्या वादात जिल्हा रुग्णालयातील साहित्य तुटले आहे. त्यामुळे दोघांवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे ओपीडी, आयपीडीसह अपघात विभाग नाळवंडी नाक्यावरील आदित्य महाविद्यालयात हलविण्यात आलेला आहे. याच रुग्णालयात एएनएम, जीएनएमच्या विद्यार्थिनी शिक्षणासाठी आहेत. त्यांना अपघात व इतर विभागात ड्यूटी लावली जाते. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची रुग्णालयात कार्यरत असणाऱ्याच एका कर्मचारी छेड काढली. या विद्यार्थिनीने याची रितसर तक्रार गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.राम देशपांडे व प्राचार्या सुवर्णा बेदरे यांची त्रिसदस्यीय समिती नियूक्त करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉ.थोरात यांनी दिले होते.
त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी समितीकडून जबाब घेण्याचे काम सुरू होते. एवढ्यात या विद्यार्थिनीचे नातेवाईक आदित्य महाविद्यालयात आले. कर्मचारी व नातेवाईक समोरासमोर येताच त्यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. इतर कर्मचारी व रुग्णाच्या नातेवाईकांनी सोडवासोडव केली. दोघांच्या वादात रुग्णालयातील खूर्च्या, टेबल व इतर साहित्याची तोडफोड झाली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. तसेच या वादामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. वाद घातल्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
शिकाऊ विद्यार्थिनीची गुरूवारी तक्रार आली होती. त्याप्रमाणे चौकशी समिती नियूक्त करून २४ तासांत अहवाल देण्यास सांगितले होते. शुक्रवारी सकाळी वाद झाल्याचे समजले आहे. तोडफोडही करण्यात आली. याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना वाद घालणारे व साहित्याची नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड