वंशाच्या दिव्यासाठी ‘त्या’ सासूने आणल्या होत्या सहा सुना; भाच्यासोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 10:57 AM2021-08-14T10:57:11+5:302021-08-14T10:57:26+5:30
बीडमधील धक्कादायक घटना; नराधम तरुणासह सासू फरार
बीड : वंशाला दिवा पाहिजे म्हणून सुनेला भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण आष्टी तालुक्यात उघडकीस आले होते. या प्रकरणातील सासूने वंशवेल वाढावी म्हणून आपल्या तीन मुलांसाठी सहा सुना आणल्याची बाब आता समोर आली आहे. पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे. अवघडलेल्या स्थितीत तिला कोर्ट, पोलीस ठाण्यांत खेटा मारण्याची वेळ आली आहे.
कडा कारखाना परिसरात राहणारे हे कुटुंब गावोगावी नंदीबैल नेऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह भागवते. तीन मुले, आई-वडील असा हा परिवार. तिघेही विवाहित, मात्र पाळणा हलला नाही. त्यामुळे सासूने एका मुलाचे तिघींशी लग्न लावले, पण त्या तिघीही नांदल्या नाहीत. दुसऱ्या मुलाच्या पत्नीने काडीमोड घेतला. पीडित सून ही पतीची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीला मूलबाळ न झाल्याने तिच्याशी फारकत घेतल्याची माहिती आहे. पीडित महिलेला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून मुलगी झाली. मात्र, वारस म्हणून मुलगाच हवा या ईर्षेने पेटलेल्या सासूने पीडित २९ वर्षीय सुनेला जीवे मारण्याची धमकी देत स्वत:च्या २३ वर्षीय अविवाहित भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. २ ऑगस्ट रोजी आष्टी ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला. त्यासाठी पोलिसांनी तीन दिवस चकरा मारायला लावल्या, शिवाय २ ऑगस्ट रोजी दिवसभर ताटकळत ठेवले, असा आरोप पीडितेच्या भावाने ‘लोकमत’शी बोलताना केला.
नराधम तरुणासह सासू फरार
पती व सासऱ्याला अंतरिम जामीन मिळाला असून नराधम तरुण व सासू फरार आहेत. विशेष म्हणजे पीडितेच्या साडेचार वर्षांच्या मुलीलाही सासूने साेबत नेले आहे. आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत अटक करावी, अन्यथा १५ ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा तिने दिला आहे.
दोन आरोपींना अंतरिम जामीन मिळाला आहे, उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. तपासात दिरंगाई झाली असे म्हणता येणार नाही.
- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी ठाणे
पीडितेला आरोपींचे काही नातेवाईक धमकावत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. दोन आरोपींचा अंतरिम जामीन रद्द करावा व सर्व आरोपींना अटक करावी, अशी विनंती सत्र न्यायालयाकडे केली आहे.
- शुभम पाटील, पीडितेचे वकील