कोळपेवाडी दरोड्यातील दोघांना बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:10 PM2018-09-07T16:10:27+5:302018-09-07T16:11:51+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील दरोड्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील दोन कुख्यात दरोडेखोरांना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बीड : अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील दरोड्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील दोन कुख्यात दरोडेखोरांना बीडपोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. दोघांनाही अहमदनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
बुच्या रामदास भोसले (४१) व अजय बंडू काळे (२२) दोघेही रा. बघेवाडी, ता. गेवराई अशी दरोडेखोरांची नावे आहेत. १९ आॅगस्ट रोजी कोळपेवाडी (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून शाम सुभाष घाडगे यांना ठार करुन २६ लाख रुपयांचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. हा दरोडा पपड्या गँगने टाकल्याची माहिती नगर पोलिसांना मिळाली होती. या गँगमध्ये बघेवाडीतील बुच्या व अजयचा समावेश होता.
त्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी बुच्या हा तलवाडा परिसरातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती बीड गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर सपोनि अमोल धस व त्यांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांना पाहताच बुच्याने धूम ठोकली. त्यानंतर त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. तर अजयला बघेवाडी येथे त्याच्या राहत्या घरी बेड्या ठोकल्या. दोघांनाही नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कुलबर्मे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, मोहन क्षीरसागर, नरेंद्र बांगर, रामदास तांदळे, बालाजी दराडे यांनी केली.