तुरुंगाच्या दगडी भिंतीआड, प्रत्येकाची आहे एक कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:21 AM2022-08-01T09:21:47+5:302022-08-01T09:23:00+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकांना येथे ठेवले जात असे.

Behind the stone walls of the prison, everyone has a story | तुरुंगाच्या दगडी भिंतीआड, प्रत्येकाची आहे एक कहाणी 

तुरुंगाच्या दगडी भिंतीआड, प्रत्येकाची आहे एक कहाणी 

googlenewsNext

- रवींद्र राऊळ
चिंचपोकळी येथील साने गुरुजी मार्गावरील आर्थर रोड तुरुंगाचा परिसर. कैद्यांची ने-आण करणाऱ्या पोलिसांच्या मोठमोठ्या वाहनांची रहदारी. तुरुंगाच्या प्रवेशद्वारासमोर कैद्यांच्या नातेवाइकांची तोबा गर्दी. कडेवर त्यांची कच्चीबच्चीही. तुरुंगात गेलेला आपला बाप कधी घरी परतणार, ही आस त्यांच्या डोळ्यात. या तुरुंगासमोरील हे दृश्य वर्षानुवर्षे कायम आहे.

कच्च्या कैद्यांची प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया गतिमान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या उपस्थितीत शनिवारी केले. निमित्त होते दिल्लीतील अखिल भारतीय जिल्हा विधि प्राधिकरणाच्या पहिल्या संमेलनाचे. 
पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या कच्च्या कैद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. थेट पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनामुळे आता तरी हा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा कैद्यांच्या पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. 

शहरी भागातील, विशेषत: मुंबईसारख्या महानगरातील आर्थर रोड तुरुंगाची अवस्था क्षमतेपेक्षा अधिक कैदी सांभाळता सांभाळता अतिशय बिकट झाली आहे.       
तिहारसारख्या तुरुंगाची स्थिती पाहता, त्या तुलनेत आर्थर रोड कारागृह अतिशय सुरक्षित समजले जाते. पण या सुरक्षित तुरुंगाची आतील अतिशय भयावह अवस्था पाहता, अन्य  तुरुंग कसे असतील याची कल्पना येते. हे तुरुंग खटला सुरू असलेल्या म्हणजे, अंडर ट्रायल, तसेच न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांचे तुरुंग. या तुरुंगात अरुण गवळीसारख्या माफिया डॉनपासून अभिनेता संजय दत्त, आर्यन खानपर्यंत अनेकांनी मुक्काम केलाय. 
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकांना येथे ठेवले जात असे. या तुरुंगाची क्षमता आठशे असली तरी प्रत्यक्षात येथे  तीन हजार कैदी कोंबले जातात. परिणामी,  येथील अंतर्गत व्यवस्था प्रभावीपणे सांभाळणे कुशल अधिकाऱ्यांनाही अवघड होऊन बसत आहे.

 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अंडरट्रायल कैद्यांची कोठडी व त्यांची सुटका न्यायालयाच्या आदेशावरून ठरते. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा प्रश्न उद्भवत नाही. 

 अनेक कैदी अतिशय शुल्लक कारणाने गुन्ह्यात अडकलेले असतात. त्यातील अनेकांना तर जामीन मंजूर झाल्यानंतरही 
जामीन देता येत नाही. त्यामुळे ते वर्षानुवर्षे आतच खितपत पडल्याची उदाहरणे आहेत.

 तुरुंगातील कैद्यांची भाऊगर्दी कमी करण्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित झाला. पण यामागील  कारणे शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
 काहींचे तर कुटुंबीय त्यांना स्वीकारायलाही तयार नसतात. त्यांच्यासमोरही बाहेर पडल्यावर आपण कुठे जायचे, हा प्रश्न उभा ठाकलेला असतो.

 काही कच्च्या कैद्यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर त्यांची वाट पाहत असतात. घरातील कमावती व्यक्ती तुरुंगात असल्याने तेही आपण न केलेल्या गुन्ह्याची सजा भोगत असतात.  

प्रत्येकाची आहे एक कहाणी 

या सगळ्याची उत्तरे आपल्या सामाजिक परिस्थितीशी निगडित आहेत. पण वर्षानुवर्षे घट्ट रुतून बसलेल्या व्यवस्थेमुळे ती उत्तरे शोधण्याचे सायास कोणी घेत नाही. आर्थर रोड तुरुंगाबाहेर जमलेल्या कैद्यांच्या नातेवाइकांच्या गर्दीकडे कुणीच सहानुभूतीने पाहात नाही. पण त्यातील प्रत्येकाची एक करुण कहाणी असते. 

कच्चे कैदी आणि त्यांच्या समस्येचे गांभीर्य सर न्यायाधीशांच्या उपस्थितीत परिषदेत अधोरेखित झाल्याने त्यावर कार्यवाही होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Behind the stone walls of the prison, everyone has a story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग