बलात्काराच्या गुन्ह्यात राजकारण्याला पाठीशी घातल्याबद्दल खंडपीठाची तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:00 AM2021-04-13T01:00:19+5:302021-04-13T01:00:36+5:30
Crime News : या संदर्भात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ डिसेंबर, २०२० रोजी महेबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद : बलात्काराच्या गुन्ह्यात पीडितेच्या जबाबावर विश्वास न ठेवता, गुन्ह्यातील आरोपी राजकारणी पुरुषाला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी अटक न करता, पाठीशी घातल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
सहायक पोलीस आयुक्त भुजबळ यांच्याकडे महिलांविषयक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास देण्यापूर्वी त्यांना ‘अशा’ गुन्ह्याचा तपास कसा करावा, याचे धडे देणे आवश्यक आहे, असे निर्देश न्या.रवींद्र घुगे आणि न्या.बी.यू . देबडवार यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना दिले.
या संदर्भात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ डिसेंबर, २०२० रोजी महेबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. तो स्वतः पोलीस ठाण्यात आला, तरी पोलिसांनी त्याला अटक केली नाही, म्हणून पीडितेने याचिका दाखल केली होती.
आरोपीला अटक करण्याचे धैर्य झाले नाही
पूर्वीच्या तपास अधिकारी आश्लेषा पाटील यांच्याकडून चार दिवसांतच तपास काढून घेतला, हे संशयास्पद आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, तो घटनेच्या दिवशी औरंगाबादेत नव्हता, तो त्याच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर होता.
गुन्हा दाखल झाल्यावर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला नाही. तो राजकारणी असल्यामुळे तपास अधिकाऱ्याला त्याला अटक करण्याचे धैर्य झाले नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.