दहिसर येथे एका सराफाला लुबाडणारा भामटा मडगावात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:56 PM2019-09-23T20:56:27+5:302019-09-23T20:59:08+5:30
अन्य एका साथीदाराला अटक
मडगाव - दहिसर येथील एका सराफाकडून साडेपाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेउन महिन्याभरापूर्वी गोव्यात पळून आलेल्या शेख मथियार रेहमान याच्या मुसक्या मडगावात पोलिसांनी आज सोमवारी आवळल्या. त्याचा अन्य एक साथिदार बबलू चौधरी याला पोलिसांनी जेरबंद केले. साडेपाच लाखांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहे. शेख हा मूळ बंगाल राज्यातील असून, तो काही वर्षापूर्वी मडगावात कारागिरी करीत होता. येथील मुडडी - नावेली येथे तो रहात होता.
रेहमान याच्या शोधासाठी दहिसर येथील पोलीस मडगावात आज सोमवारी दाखल झाले. मडगाव पोलीस ठाण्यात आल्यानंतर या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना संशयिताचे छायाचित्र व मोबाईल क्रमांक दिला. मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. यावेळी तो मुडडी येथे रहात असल्याचे कळाले. मडगाव पोलीस ठाण्याचे एलआयबी पोलीस पथक गोरखनाथ गावस व विशाल प्रभू यांनी नावेली येथे जाउन रेहमान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण दागिने बबलू याला विकण्यासाठी दिले होते असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बबलूलाही पकडले. बबलू याने एका सराफाला दागिने विकले होते. ते मागाहून जप्त करण्यात आले. शेख याने मुंबईतील एका सरफाचे दागिने पळविले होते. कारागिरी करण्यासाठी सराफाने त्याला 178 ग्राम सोन्याचे दागिने दिले होते. ते परस्पर घेउन तो गोव्यात पळून आला होता. मागाहून त्याच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंद झाली होती.