"माझं महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण ती मला..."; मुक्ती रंजनने आईसमोर दिली हत्येची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:33 PM2024-09-26T12:33:43+5:302024-09-26T12:42:51+5:30
बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. महालक्ष्मीची हत्या तिच्यासोबत काम करणाऱ्या मुक्ती रंजन राय याने केली होती.
बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. महालक्ष्मीची हत्या तिच्यासोबत काम करणाऱ्या मुक्ती रंजन राय याने केली होती. तिची हच्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुक्ती रंजनने आपल्या आईकडे हत्येची कबुली दिली होती. आपल्या सुसाईड नोटमध्ये असंही लिहिलं आहे की, "माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण ती मला किडनॅपिंग केसमध्ये अडकवण्याची धमकी द्यायची."
भद्रक जिल्ह्यातील धुसुरी येथे मुक्ती रंजनचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांचा दावा आहे की, त्याच्याकडे एक सुसाइड नोट देखील सापडली आहे, ज्यामध्ये मुक्ती रंजनने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आदल्या रात्री मुक्ती रंजन रायने आईकडे महालक्ष्मीच्या हत्येची कबुली दिली होती.
ओडिशा पोलीस सूत्रांनी आज तकला सांगितलं की, मुक्ती रंजन सुमारे तीन वर्षांनंतर ओडिशातील त्याच्या घरी पोहोचल्याचं आमच्या तपासातून समोर आलं आहे. रात्री आईसमोर मुक्ती रंजन ढसाढसा रडला आणि म्हणाला की, मी महालक्ष्मीला मारलं आहे. आईसमोर हत्येची कबुली दिल्यानंतर पहाटे पाच वाजता त्याने आत्महत्या केली.
महालक्ष्मी हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत बंगळुरू पोलिसांनी ओडिशा पोलिसांशी संपर्क साधला आहे. महालक्ष्मी प्रकरणाचे तपास अधिकारी बंगळुरूहून ओडिशाला जाणार आहेत. घटनास्थळी सापडलेली मुक्तीची सुसाईड नोट आणि घटनास्थळावरून जप्त केलेला लॅपटॉप आणि इतर वस्तू ताब्यात घेण्यात येणार आहेत.
पोलिसांना सापडलेल्या मुक्ती रंजनच्या सुसाईड नोटमध्ये त्याने बहुतांश ठिकाणी इंग्रजी तर काही ठिकाणी ओडिया भाषेचा वापर केला आहे. महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देताना मुक्ती रंजनने लिहिलं की, "मला ती आवडायची, माझं तिच्यावर प्रेम होतं, पण तिची माझ्यासोबतची वागणूक चांगली नव्हती. ती मला किडनॅपिंगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असे. मी खूप पैसेही खर्च केले."
बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होते. इथेच दोघांची मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. महालक्ष्मी मुक्ती रंजनवर लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. यावरून संतापलेल्या मुक्ती रंजनने महालक्ष्मीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले."