Bengaluru Murder: भाडेकरूने 75 वर्षीय महिलेला 91 वेळा भोसकलं, थरकाप उडवणाऱ्या घटनेने शहरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:45 PM2022-07-26T13:45:39+5:302022-07-26T13:46:28+5:30
Bengaluru Murder: महिलेची हत्या करुन तिच्या मुलाला माहिती दिली, नंतर अंत्यसंस्कारातही सामील झाला. बंगळुरूमध्ये घडली अमानवीय घटना
बंगळुरू: बंगळुरूमध्ये एका 75 वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. महिला घरमालकाशी झालेल्या भांडणातून एका 29 वर्षीय भाडेकरूने या वृद्ध महिलेवर चाकूने वार करून खून केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेच्या शरीरावर 91 वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तो संशयाच्या यादीत नव्हता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयकिशन हा यशोदामा नावाच्या महिलेच्या घरात भाड्याने राहत होता. तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. यशोदामा 2 जुलै रोजी दक्षिण बंगळुरूमधील विनायक नगर येथील त्यांच्या घराच्या तळमजल्यावर मृतावस्थेत आढळल्या होत्या. गेल्या 23 दिवसांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यादरम्यान, 100 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली. भाडेकरू जयकिशन हा पोलिसांच्या संशयितांच्या यादीत कुठेच नव्हता. जयकिशननेच 2 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता यशोदामाचा मुलगा राजू याला फोन यशोदामाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले होते.
एका चुकीने पकडला गेला
यशोदामाच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही आरोपी महिलेच्या कुटुंबीयांना मदत करत राहिला. त्यामुळे त्याने अशी घटना घडवून आणली असेल, असा कुणी विचारही केला नव्हता. पण घटनेच्या काही दिवसांतच त्याच्याकडून मोठी चूक झाली. हत्येनंतर यशोदामाने घातलेले दागिने गायब झाले होते. या हत्येमागे आर्थिक फायदा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, घटनेच्या काही दिवसानंतर जयकिशनने अनेक लोकांचे सुमारे 4 लाख रुपयांचे कर्ज फेडले. यामुळेच पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.
हत्या का केली?
जयकिशनने पोलिसांना सांगितले की, त्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते, त्यात त्याचे मोठे नुकसान झाले. पैसे गुंतवण्यासाठी त्याने कर्ज घेतले, लोकांचे कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज घेतले आणि कर्जाच्या विळख्यात अडकला. यशोदामाकडूनही त्याने 50 हजार रुपये घेतले होते. जयकिशनचा यशोदामासोबत 1 आणि 2 जुलै रोजी पैशावरून वाद झाला होता. प्रकरण वाढल्यानंतर किशनने रागाच्या भरात यशोदामाची हत्या केली.