क्रूरतेचा कळस! खेळता खेळता पाणी उडालं; संतापलेल्या शिक्षिकेची मुलाला मारहाण, तोडला दात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:08 PM2024-11-09T12:08:55+5:302024-11-09T12:18:19+5:30
बंगळुरूमधील एका खासगी शाळेतून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे
बंगळुरूमधील एका खासगी शाळेतून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बंगळुरूच्या होली क्राइस्ट इंग्लिश स्कूलमध्ये काही विद्यार्थी एकमेकांवर पाणी उडवत होते. याच दरम्यान, पाण्याचे काही थेंब त्यांच्या एका शिक्षिकेवर पडले. पाणी पडल्याने संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली. यामध्ये मुलाचा दात तोडला.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून शिक्षिकेविरुद्ध एफआयआर नोंदवला. एफआयआरनुसार अजमथ असं शिक्षिकेचं नाव आहे. यानंतर शुक्रवारी दुपारी अजमथने देखील पोलिसांत जाऊन मुलाच्या पालकांविरुद्ध तक्रार करायची असल्याचं सांगितलं. फी वरून पालकांसोबत वाद झाला होता.
मीडियाशी बोलताना विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, गेल्या वर्षी याच शाळेतील आणखी एका शिक्षकाने त्यांच्या ६ वर्षांच्या मुलीलाही मारहाण केली होती, त्यामुळे तिचा हात आठवडाभर सुजला होता. त्यांनी शाळा प्रशासनाला प्रश्न विचारला असता त्यांनी माफी मागितली आणि माफीनामा पत्र दिलं. मुलगा आणि इतर विद्यार्थी मधल्या सुटीमध्ये एकमेकांवर पाणी उडवत होते. याच दरम्यान शिक्षिकेच्या कपड्यावर पाणी पडलं.
अजमथने मुलाला यानंतर बेदम मारहाण केली. याच दरम्यान मुलाचा दातही तोडला. शाळा प्रशासनाने हे आरोप नाकारले आहेत. शिक्षिकेने मुलाला मारलं नाही. तिथे फक्त लाकडाची पट्टी हातात घेतली. शिक्षिका मारतील म्हणून मुलगा पळून जात होता. तेव्हा तो एका टेबलला धडकला आणि खाली पडला. यातच मुलाचा दात तुटल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.