महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:50 PM2024-09-25T23:50:03+5:302024-09-25T23:51:03+5:30
Bengaluru Mahalakshmi Murder Case: मुक्ती रंजन रॉयचा मृतदेह ओडिशात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
Bengaluru Mahalakshmi Murder Case: बंगळुरूमधील महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. महालक्ष्मीच्या हत्येचा ज्याच्यावर संशय होता, त्याच्याच मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुक्ती रंजन रॉयला संशयित आरोपी म्हणून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, मुक्ती रंजन रॉयचा मृतदेह ओडिशात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
महालक्ष्मीच्या हत्येनंतर संशयित मुक्ती रंजन रॉय ओडिशात लपून बसल्याचे बोलले जात होते. मुक्ती रंजन रॉयने मंगळवारी सकाळी कुळेपाडा स्मशानभूमीजवळ स्कूटरवर लॅपटॉप ठेवून गळफास लावून घेतल्याचे म्हटले जात आहेत. कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली असून पोलिसांनी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
मुक्ती रंजन रॉय हा महालक्ष्मीसोबत फॅशन फॅक्टरीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक पथक ओडिशात पाठवले. या संशयित मुक्ती रंजन रॉयचा महालक्ष्मी खून प्रकरणात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मृतदेहाचे अनेक तुकडे
काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये २९ वर्षीय महालक्ष्मीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. फ्रीजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात पाय होते, तर सगळ्यात खालच्या कप्प्यात मुंडकं. दरदरून घाम फोडणारे हे दृश्य बघितल्यावर घर मालकालाच नाही, तर पोलिसांनाही घाम फुटला होता. या प्रकरणाबाबत पोलिसांनी म्हटले होते की, अशी प्रकरणे वैद्यकीय तज्ज्ञांसाठीही आव्हान निर्माण करतात. कारण, त्यांच्याकडे संपूर्ण डेडबॉडी नसल्याने महालक्ष्मीची हत्या कशी झाली हे शोधणे कठीण आहे.
मुक्ती रंजन रॉयवर संशय का आला?
हत्येनंतर मुक्ती रंजन रॉय आपले लोकेशन वारंवार बदलत होता. त्यामुळे पोलिसांना मुक्ती रंजन रॉयवर संशय होता. आरोपीच्या फोनवरून तो पश्चिम बंगाल आणि ओडिशा सीमेजवळ कुठेतरी लपून बसल्याचे उघड झाले होते. मात्र, पोलिस येण्यापूर्वी मुक्ती रंजन रॉय यांनी स्मशानभूमीजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे कारण अद्याप तरी गूढच आहे.