भाजप आमदाराच्या घरावर धाड, ६ कोटी रुपये जप्त; मुलालाही केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:26 PM2023-03-03T12:26:12+5:302023-03-03T12:27:56+5:30
आमदार विरुपक्ष्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलाने ४० लाख रुपयांची लाच घेतल्यामुळे त्यास अटक करण्यात आली होती
कर्नाटकमध्ये आज सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथील बंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्ड (बीडब्ल्यूएसएसबी) चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. प्रशांत हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. या कारवाईनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असून घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आमदार विरुपक्ष्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलाने ४० लाख रुपयांची लाच घेतल्यामुळे त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता आमदार महोदयांच्या घरावरही लोकायुक्तांनी धाड टाकली असून ६ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तर, मुलाच्या कार्यालयातून २ कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.
कर्नाटक साबण आणि डिटेर्जेंटला लिमिटेड (केएसडीएल) बोर्डासाठी कच्चा माल पुरवठा करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवरुन याबाबत तक्रार करण्यात आली होती. प्रशांतचे वडिल आमदार मदल विरुपक्षप्पा हे केएसडीएलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे, याप्रकरणी संबंधित अधिकारी भाजप आमदार विरुपक्षप्पा यांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांच्या घरातून ६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर, आमदार महोदयांनी केएसडीएलच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे.
४० लाख रुपयांची लाच घेताना मुलाला अटक
कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार असून विरोधकांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर लाचखोरी आणि टेंडरमध्ये टक्केवारी, पैशांची अफरातफरीचा आरोप केला जात आहे. प्रशांत यांनी एका टेंडर प्रक्रियेला क्लिअर करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याचपैकी, ४० लाख रुपयांची रक्कम स्विकार करताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांना रंगेहात अटक केली. लोकायुक्तांकडून आता या घटनेची व कागदपत्रांची सखोल चौकशी होत आहे.