१२ वर्षे काम करणाऱ्या नोकराने केला विश्वासघात; चोर नोकराला केली पोलिसांनी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:14 PM2018-08-09T20:14:34+5:302018-08-09T20:16:37+5:30
कांदिवली पोलिसांनी २४ तासांच्या आत त्या नोकराला गजाआड केले.
मुंबई - तब्बल १२ वर्षे सराफाकडे काम करणाऱ्या नोकराच्या मनात पैश्याची हाव निर्माण झाली. झटपट पैसा कमविण्याच्या विचाराने त्याच्या मालकाने दागिने बनविण्यासाठी कारखान्यात घेऊन जाण्यासाठी दिलेले ३४० ग्रॅम सोने त्याने विश्वासघात करून चोरून नेले. सोने घेऊन पळण्यात तो यशस्वी ठरला. मात्र कांदिवली पोलिसांनी २४ तासांच्या आत त्या नोकराला गजाआड केले.
कांदिवलीच्या लालजीपाडा येथील एका सराफाचे सोन्याचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे भावेश रॉय हा गेल्या १२ वर्षांपासून कामाला होता. ६ ऑगस्ट रोजी हसमुख यांनी चेन बनविण्यासाठी ३४० ग्रॅम वजनाचे सोने भावेशला कारखान्यात घेऊन जाण्यास दिले होते. त्यानुसार भावेश ते सोने घेऊन निघाला. मात्र तो कारखान्यात पोहचलाच नाही. अचानक गायब झाल्यामुळे फिर्यादी सराफाने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची लागलीच दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले, पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू करून गावी पळण्याच्या तयारीत असलेल्या भावेश रॉयला २४ तासांत अटक करून त्याच्याकडून २४० ग्रॅम वजनाचे व ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोने हस्तगत केले आहे.