सहार वाहतूक विभागाच्या अंमलदारांची उत्तम कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 04:26 PM2019-06-05T16:26:44+5:302019-06-05T16:29:15+5:30
अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या आवळल्या मुसक्या; 6.73 लाख रुपयांचा गुटखा जप्त
मुंबई - गुटखा, सुगंधीत पान मसाल्यावर बंदी असतानाही अवैधरीत्या गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी मुंबई वाहतूक शाखेच्या सहार वाहतूक विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रमाकांत मनोहर बडगुजर आणि पोलीस शिपाई तुषार उदयसिंग भोसले यांनी केली. टेम्पो चालकाला गुटख्यासह अंधेरीपोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
सहार वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रमाकामत बडगुजर हे कर्तव्यावर असताना त्यांना गुटख्याची माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांना सांगून पोलीस शिपाई रमाकांत बडगुजर व पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी सहार जंक्शन येथे आलेला टेम्पो क्रमांक एमएच - 04 / जीएफ - 9198 अडवला. टेम्पोची झडती घेतली असता त्यात गोण्या आढळून आल्या. त्या गोण्या उघडल्या असता त्यात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. पोशि बडगुजर व पोशि भोसले यांनी टेम्पो चालकासह गुटखा अंधेरीपोलिसांच्या ताब्यात दिला.
दरम्यान, अंधेरी पोलिसांनी गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. त्या गुटख्याचे मोजदाद केले असता त्याची किंमत एकूण 6 लाख 73 हजार 200 रुपये असल्याचे सप्ष्ट झाले. बंदी असताना गुटख्याची वाहतूक केल्या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी भादंवि कलम 328, 179, 188, 273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम 59, 26(2), (4), सह अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या 20 जुलै 2018 च्या आदेशानुसार कलम 27(3), (डी), 27(3)(इ) नुसार गुन्हा दाखल करून टेम्पो चालक निरव सहानी याला अटक केली. सहानी याने गुटखा कोठून आणला? कोणाला देण्यासाठी टेम्पोतून नेत होता? याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत.