प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त; शिवाजी पार्कातून नो फ्लाईंग झोन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 08:50 PM2019-01-25T20:50:49+5:302019-01-25T20:55:40+5:30
मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दल, क्युआरटी सज्ज; वाहतूक पोलिसांची शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी
मुंबई - संपूर्ण देशात उद्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा सज्ज झाल्या असतानाच मुंबईत देखील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह, राज्य राखीव पोलीस दल, तसेच शिघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांना सतर्कत राहणाच्या इशारा देण्यात आला असल्याने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे.
उद्या प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील नेहमीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून मुंबईभर वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी होणाऱ्या गर्दीचा फायदा दहशतवाद्यांसारख्या समाजविघातक लोक फायदा घेऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या सरकारी इमारती, रेल्वे स्थानके, विमानतळ तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांबरोबरच शिघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पॅराशूट, पॅरारायडिंग, रिमोटवर चालणारे ड्रोन उडविण्यास मुंबई हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून दाटीवाटीच्या वस्तीतील गेस्ट हाऊस, हॉटेल्स, लॉजेसची पोलिसांकडून झाडाझडती घेऊन संशयितांना ताब्यात घेण्यात येत असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवाजी पार्क येथे नो फ्लाईंन झोन
शिवाजी पार्क मैदानात ध्वजारोहण आणि संचलन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. अशा दरम्यान, शिवाजीपार्क मैदानाच्या हवेतुन कोणेतही विमान अथवा हेलिकॉप्टर जाणार नसून हा परिसर नो फ्लाईंग झोन असल्याचे पोलिसांनी सांगितले.