England vs India: प्रत्येक 'बाॅल'वर सहा सेकंदात बेटिंग; गहुंजेतील भारत-इंग्लंड मॅचवेळी रॅकेट उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:29 AM2021-03-27T10:29:36+5:302021-03-27T11:10:08+5:30
England vs India 2nd ODI Betting Racket: एमसीएच्या गहुंजे येथील (पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (Online Betting Racket) करण्यात आला आहे. सामन्याचे प्रक्षेपण होण्यासाठी सहा सेकंदांचा अवधी लागतो. त्याचा गैरफायदा घेत त्या सहा सेकंदांच्या अवधीसाठी प्रत्येक 'बाॅल'वर पैसे लावण्यास सांगून हे बेटिंग सुरू होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईमध्ये महराष्ट्रासह परराज्यातील ३३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलिसांनी शुक्रवारी(दि. २६) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. (Online Betting Racket busted in Pune.)
एमसीएच्या गहुंजे येथील (पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे आरोपी दुर्बिणीने निरीक्षण करीत होते. त्यामुळे प्रत्येक बॉलचा खेळ त्यांना थेट पाहता येत होता. त्या खेळाचे लाईव्ह टेलिकास्ट होण्यासाठी सहा सेकंदांचा अवधी लागतो. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी एका ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा घेत होते. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार तीन पथके तयार करून मामुर्डी गाव, घोरवडेश्वर डोंगर आणि विमाननगर परिसरात छापा मारून ३३ जणांना अटक केली.
आरोपींकडून ७४ मोबाईल, ३ लॅपटॉप, एक लाख २६ हजार ४३० हजारांची रोकड, २८ हजार रुपये किंमतीची विदेशी चलनातील नाणी, कॅमेरे, दुर्बीण, स्पीकर आणि चारचाकी वाहन, असा ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मध्यप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, उत्तरप्रदेश येथील आरोपींचा समावेश आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा वापर
आरोपींनी स्टेडियमलगतच्या घोरावडेश्वर डोंगर तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा वापर केला. तेथून दुर्बिणीने सामन्याचे निरीक्षण करून बेटिंग घेत होते. यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.