आयपीएल सामन्यावर बेटिंग, बाणावलीत कर्नाटकातील आठ जण जेरबंद!
By सूरज.नाईकपवार | Published: May 5, 2024 03:44 PM2024-05-05T15:44:56+5:302024-05-05T15:45:12+5:30
काल शनिवारी रात्री बेंगलोर चँजलर्स व गुजरात टायटन या दोन संघात सामना होता. त्या सामन्याचे बेटिंग संशयित घेत होते.
मडगाव : आयपीएल सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या एका टोळीचा गोव्यातील सासष्टीतील कोलवा पोलिसांनी पर्दाफाश करताना मूळ कर्नाटातील आठ जणांच्या मुसक्या आवळल्या. काल शनिवारी रात्री बेंगलोर चँजलर्स व गुजरात टायटन या दोन संघात सामना होता. त्या सामन्याचे बेटिंग संशयित घेत होते.
पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद करताना मोबाईल संच , वाहन व अन्य वस्तू मिळून एकूण १८ लाखांचा ऐवज जप्त केला.भुषण पुजारी, श्रीषेकेश पाटील, कपील सावंत, ओंकार पाटील, आफ्रिद नंदुबील, तोहिल बिडीकर , शुभम पाटील, सय्यद बागवान अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सर्व संशयित मूळ कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील आहे.
वासवाडो येथे या सर्वांनी एक फ्लॅट भाडयाने घेतला होता. तेथे आयपीएल सामन्याची सट्टेबाजी चालू होती. पोलिसांना त्याचा सुगावा लागला होता. त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी त्या फ्लॅटवर छापा टाकला असता संशयित सापडले. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई व अन्य पोलिसांनी वरील कामगिरी बजाविली.