सावधान! क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करताच बँक खाते होईल साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 10:57 AM2022-08-25T10:57:20+5:302022-08-25T10:57:41+5:30

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला लावतात, त्याशिवाय ओटीपी विचारतात.

Beware! As soon as you download the Quick Support app, your bank account will be cleared | सावधान! क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करताच बँक खाते होईल साफ

सावधान! क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करताच बँक खाते होईल साफ

Next

जळगाव : आपल्याला कर्ज हवे आहे, क्रेडिट कार्ड बंद करायचेय, कार्ड ब्लॉक करायचेयं, आयकर परतावा मंजूर झालेला आहे, अशी अनेक कारणे सांगून आपल्याला क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करायला लावणे किंवा लिंकवर जाऊन क्लिक करायला कोणी सांगितले अन् तुम्ही तसे केले तर क्षणातच तुमचे बँक खाते साफ केले जाते. हे ॲप डाऊनलोड करताच बँकेतील खाते साफ होईल. सायबर गुन्ह्यात आता हा नवीन प्रकार सुरू झाल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली.

आपली गुप्त माहिती सायबर गुन्हेगारांना देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर असून कोणी अभियंता, कोणी डॉक्टर, प्राचार्य तर कोणी उच्च शिक्षित आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत सायबर पोलिसांकडे रोज किमान एक तरी तक्रार येते. काही जण तोंडी तक्रार करतात तर ज्यांची जास्त रक्कम गेलेली असते ते फिर्याद देतात.

अनोळखी नंबरवरील मॅसेज, कॉल टाळा
अनोळखी नंबरवरून येणारे कॉल व मॅसेज शक्यतो टाळले पाहिजे. त्यांना कुठलाही प्रतिसाद देऊ नये. एखाद्यावेळी कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद दिला गेला तर समोरच्या व्यक्तीला विचारलेली आपली माहिती चुकूनही देऊ नका. कारण तुमची ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुठलेही ॲप खात्री केल्याशिवाय डाऊनलोड करू नका
प्रिय महोदय, तुम्हाला १५ हजार ४९० रुपये आयकर परतावा मंजूर झालेला आहे. रक्कम लवकरच तुमच्या खात्यावर जमा केली जाईल. कृपया तुमचा खाते क्रमांक ...सत्यपित करा. हे बरोबर नसल्यास, कृपया खालील लिंकवर जाऊन तुमचे बँक खाते अपडेट करा, असे सांगून एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करताच बँक खात्यातील रक्कम गायब होते. त्यामुळे कुठलेही ॲप किंवा लिंक खात्री केल्याशिवाय डाऊनलोड करू नका.

कोणालाही ओटीपी सांगू नका
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला लावतात, त्याशिवाय ओटीपी विचारतात. आपला ओटीपी कोणालाही सांगू नये. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ट्रॅन्झॅक्शन होत आहे. ते बंद करावे लागेल, असे म्हणत एका डॉक्टरकडून ओटीपी विचारून सायबर गुन्हेगाराने ४९ हजार ६१२ रुपयात गंडविले होते.

१) शून्य टक्के व्याजदराच्या नावाने १९ लाखात गंडा
शून्य टक्के व्याजदराने कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली पिंपळगाव हरेश्वर येथील संदीप विठ्ठल महाजन यांची १९ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. सायबर पोलिसांनी या सतिंदर सिंह तरलोक सिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता (दोन्ही रा. दिल्ली) यांना अटक केली होती.

२) टास्कच्या नावाने महिला डॉक्टरची ६३ हजारात फसवणूक
शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रशिक्षण घेत असलेल्या अदिती सुनील पाटील (वय २३,रा.खिर्डी बु.ता.रावेर) या महिला डॉक्टरची टास्कच्या नावाने ६३ हजार ८२५ रुपयांनी ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. होम बेस जॉब म्हणून मेसेज असल्याने अदिती यांनी मेसेजमधील क्रमांकाच्या व्हाॅट्सॲपवर मॅसेज केला. त्यावर समोरील व्यक्तीने आम्ही तुम्हाला टास्क देऊ, ते तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमचे पैसे व कमिशन देऊ, असे सांगून मोबाइलवर एक लिंक पाठवली होती. त्या वेबसाईडवर टास्क पूर्ण करताना त्यांची फसवणूक झाली होती.

३) इंस्टाग्रामवर तरुणाला पावणे सहा लाखाचा गंडा
शेअर मार्केटमध्ये काजल ट्रेडिंग कंपनीसोबत ऑनलाइन ट्रेडिंग करून जास्त नफ्याचे आमिष दाखवत सचिन अशोककुमार मंधान (रा.जळगाव) या तरुणाला इंस्टाग्रामद्वारे ५ लाख ७६ हजार १५१ रुपयांनी गंडविण्यात आल्याचा प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता.

आयकर परतावा, कर्ज प्रकरण, बक्षीस यासह सायबर गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे अनेक घटनांवर उघड झालेले आहे. त्यामुळे कोणत्याही ॲपवर जाऊन लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी व्यक्तींच्या संदेशालाही प्रतिसाद देऊ नये. फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाइन व्यवहार जपून केला पाहिजे.
-लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक

Web Title: Beware! As soon as you download the Quick Support app, your bank account will be cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.