सावधान... बाल सुधारगृहाला ड्रग्जचा डंख

By मनीषा म्हात्रे | Published: June 19, 2023 11:04 AM2023-06-19T11:04:09+5:302023-06-19T11:53:46+5:30

या मुलांकडे गांजासह ब्लेड, मोबाइलही मिळून आला होता. त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडून एका फोनवर हे उपलब्ध झाले होते.

Beware... drug sting to juvenile correctional facility | सावधान... बाल सुधारगृहाला ड्रग्जचा डंख

सावधान... बाल सुधारगृहाला ड्रग्जचा डंख

googlenewsNext

ड्रग्जच्या विळख्यात अडकत असलेल्या मायानगरी मुंबईला ‘ड्रग्ज फ्री’ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावरून ‘मिशन थर्टी डेज’ ही धडक मोहीम मुंबई पोलिसांनी हाती घेतली. ही मोहीम सुरू असतानाच डोंगरीतील बालसुधारगृहात सुरक्षाकवच भेदून भिंतीपलीकडून ड्रग्ज पोहोचत असून, गुन्हेगारांची एक पुढची पिढी तयार होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात १० हजार स्क्वेअर यार्ड एवढ्या मोठ्या विस्तीर्ण परिसरामध्ये हे डोंगरी बालसुधारगृह वसलेले आहे. सध्या बालगुन्हेगारांसोबतच हरवलेली, बालमजुरीत अडकलेली, तसेच भिक्षेकरी मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. नुकतेच एका कारवाईत बालसुधारगृहाच्या भिंतीवरून मुलांना बिनधास्तपणे ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आले. या मुलांकडे गांजासह ब्लेड, मोबाइलही मिळून आला होता. त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडून एका फोनवर हे उपलब्ध झाले होते. डोंगरी पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईपूर्वीदेखील अंमलदाराने भिंतीपलीकडून आलेले ड्रग्ज जप्त केले होते.

३३.३२कोटी रुपयांचे ड्रग्ज चार महिन्यांत जप्त
 मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी तब्बल ४ हजार ९३५ कोटी २९ लाख ६१ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
 यावर्षी एप्रिलअखेरपर्यंत ४ हजार ४८१ गुन्हे नोंद असून, ४,५२३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३३ कोटी ३२ लाख ९८ हजारांचे ड्रग्ज जप्त केले आहे.

२०० ते ३०० रुपयांत मुलांचा ड्रग्ज तस्करीसाठी वापर
धारावी, कुर्ला, वडाळा, अँटॉप हिलसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर केल्याचे एनसीबीच्या कारवाईतून समोर आले होते. कुर्ल्यातून अटक करण्यात आलेला बबलू पॅट्री लहान मुलांकडून ड्रग्ज तस्करी करून घेत होता. या मुलांना आधी ड्रग्जचे व्यसन लावायचे, पुढे ही नशा पूर्ण करण्यासाठी त्यांना २०० ते ३०० रुपये देऊन त्यांच्याकडून तस्करीचे काम करून घेतले जात होते. एक मुलगा गेल्या चार वर्षांपासून काम करत असल्याचेही समोर आले होते. आजही काही तस्कर या मुलांचा वापर करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

पोलिसांचा समुपदेशनावर भर...
कारवाईनंतर अटक केलेल्या तरुण, तरुणींसह त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करण्यात येत आहे. तरुणाईनेदेखील ड्रग्जला नाही म्हणत आयुष्याला हो म्हणा. ड्रग्ज सेवनाबरोबर त्याच्या तस्करीत वेळ घालवण्यापेक्षा देशासाठी काही तरी करा. आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

पालकांनी काय करावे?
तरुणाईने ड्रग्जच्या आहारी जाऊ नये,  तसेच पालकांनी पाल्य काय करतो यावर लक्ष ठेवायला हवे. आपला मुलगा एकटा राहतोय का? इंटरनेटवर त्याचा वावर वाढलाय का? त्याचे मित्रमंडळी बदलले आहेत का? याची माहिती घेत काही चुकीचे आढळून आल्यास पाेलिसांची मदत घ्यावी.

Web Title: Beware... drug sting to juvenile correctional facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.