राहा सावधान! अन्यथा नोकरीचा कॉल करेल कंगाल; बँक खातं होईल रिकामं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:40 AM2021-08-11T06:40:23+5:302021-08-11T06:41:35+5:30
खात्री करून घ्या; अन्यथा बँक खाते होईल रिकामे
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधीची तीव्र गरज आहे. अशा परिस्थितीत त्यांची फसवणूक होण्याची शक्यता दाट आहे. नोकरी देण्याच्या फसव्या जाहिराती देऊन आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.
मोडस ऑपरेंडी काय?
ऑनलाइन जॉब फ्रॉड या प्रकारात बनावट जॉब पोर्टल्स तयार केले जातात.
बनावट जॉब पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करणाऱ्या उमेदवाराच्या बँकेचा, क्रेडिट वा डेबिट कार्डचा तपशील घेतला जातो.
नोकरीच्या आशेने उमेदवार हा सर्व तपशील भरतात आणि त्यांचे बँक अकाऊंट हॅक होते.
काही प्रकारांत तर उमेदवाराची मुलाखतही घेतली जाते.
मुलाखतीनंतर उमेदवाराला प्रशिक्षणासाठी ठरावीक रक्कम भरावी लागेल, असे सांगितले जाते. त्यातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते.
काय काळजी घ्यावी ?
हे कायम लक्षात ठेवा की, कोणतीही नामांकित कंपनी नोकरी देताना उमेदवाराकडून पैशांची मागणी करत नाही.
कोणत्याही अनोळखी जॉब पोर्टलवर पैसे भरू नका. नोकरीसाठी माहिती भरताना संबंधित जॉब पोर्टलची खात्री करून घ्या. ते विश्वासार्ह वाटले तरच सर्व नोंदणी करा.