मुंबईत घाण करताय तर सावधान; तुमच्यावर दाखल होणार गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 08:40 PM2019-07-30T20:40:25+5:302019-07-30T20:42:34+5:30
पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे.
मुंबई - रस्ते, नाले आणि सार्वजनिक परिसर घाण करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस थेट गुन्हा नोंदवणार आहेत. पालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.
मुंबईत महापालिकेच्या २४ वॉर्डात आता मुंबईच्या ९४ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवार स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका कर्मचारी असं २०० जणांचं पथक प्रत्येक वॉर्डात साफसफाई करणार आहे. या मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठ्या साफसफाई मोहिम राबवणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत क्लिन-अप मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यात, उघड्यावर घाण टाकणारे, थुंकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर आता मुंबई पोलीस थेट पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले.