सावधान! घरकाम करायला बाई ठेवताय?; चोरट्या बाईच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:07 PM2018-07-24T22:07:04+5:302018-07-24T22:07:54+5:30
नोकराने केला विश्वासघात; लाखोंचा लावला होता चुना
मुंबई - चिंचपोकळी परिसरातील शांती कमल सोसायटीत राहणाऱ्या धीरजकुमार संघवी (वय - ४१) यांना त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या बाइने ४२ लाख ८० हजारांना काल चुना लावला होता. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सोसायटीने ठेवलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या माहितीमुळे पोलिसांना या गुन्हांचा छडा फार कमी वेळेत लावला आला. पोलिसांनी कल्याण येथील आंबोली परिसरातील बनेली गावातून तुकतुकी राजेश शेख (वय - २६) या महिलेला अटक केली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून धीरजकुमार हे धार्मिक कामानिमित्त राजस्थान येथे आपल्या गावी गेले होते. काल दुपारी धीरजकुमार यांची पत्नी मुलीला शाळेत सोडण्यास गेली होती. घरात कोणीही नसल्याचे पाहून तुकतुकीने संघवी यांच्या घरातील ४० लाख ८० हजारांचे दागिने आणि २ लाखांची रोकड लंपास केली. याबाबत काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोसायटीकडे जमा असलेले तुकतुकीचे आधारकार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानुसार तपासास वेग आला. मोबाईल बंद असल्याने आधारकार्डवरील पत्ता पोलिसांनी गाठला जेथे तुकतुकी राहत होती. तो पत्ता होता कुर्ला इथला. मात्र, घरातील सामान गायब करून बंद करण्यात आले होते. तेथे चौकशी केल्यानंतर कल्याण येथील तुकतूकीचा पत्ता सापडला. कल्याण येथून तुकतुकी आणि तिचा पती राजेश शेख जो बांधकाम साईट्सवर काम करतो तो मिळून पश्चिम बंगला येथे आपल्या गावी पळून जाणार होते. पण, तितक्यातच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली. तिच्याकडून सर्व दागिने आणि काही रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. काही रक्कम तुकतुकीने साडी आणि राजेश कपडे खरेदी करण्यासाठी वापरले असल्याची माहिती हिरे यांनी दिली.