जादूटोण्याच्या संशयातून भाच्याची हत्या प्रकरण : आरोपी होती पोलिसांची पंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:14 PM2019-11-21T23:14:34+5:302019-11-21T23:16:29+5:30

जादूटोण्याच्या संशयातून स्वत:च्या भाच्याची हत्या करणारी महिला आरोपी पोलिसांची पंटर होती, अशी जोरदार चर्चा आहे. पोलिसांच्या डावपेचाची माहिती असल्यामुळे या महिला आरोपीने आता पोलिसांवर आरोप लावून स्वत:चा पीसीआर शिथिल करण्याचे डावपेच चालविले आहे.

Bhachi murder case on suspicion of witchcraft: The accused was a police punter | जादूटोण्याच्या संशयातून भाच्याची हत्या प्रकरण : आरोपी होती पोलिसांची पंटर

जादूटोण्याच्या संशयातून भाच्याची हत्या प्रकरण : आरोपी होती पोलिसांची पंटर

Next
ठळक मुद्देमुलीच्या मित्राकडून घडविला नागपूरच्या वाठोडा भागात थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जादूटोण्याच्या संशयातून स्वत:च्या भाच्याची हत्या करणारी महिला आरोपी पोलिसांची पंटर होती, अशी जोरदार चर्चा आहे. पोलिसांच्या डावपेचाची माहिती असल्यामुळे या महिला आरोपीने आता पोलिसांवर आरोप लावून स्वत:चा पीसीआर शिथिल करण्याचे डावपेच चालविले आहे. अरुण संतोष वाघमारे (वय ३५, रा. अंबेनगर, पारडी) नामक ऑटोचालकाची आरोपी रत्नमाला मनोज गणवीर हिने तिची मुलगी पिहू ऊर्फ शुभांगी तसेच तिचा मित्र किसन विश्वकर्मा या दोघांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. मृत अरुण वाघमारे हा आरोपी रत्नमालाचा सख्खा चुलतभाचा होता, हे विशेष !
नेहमीप्रमाणे १६ नोव्हेंबरला अरुण त्याचा ऑटो घेऊन घराबाहेर पडला. मात्र, रात्र उलटली तरी तो परतला नाही. अखेर त्याचा रक्ताने माखलेला मृतदेहच पोलिसांना मिळाला. नातेवाईकांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली असता मृत अरुणची आत्या रत्नमाला गणवीर आणि तिची मुलगी शुभांगी ऊर्फ पिहू या दोघीं वारंवार विसंगत माहिती देत असल्याने त्यांच्यावर पोलिसांचा संशय गेला. त्यांची कसून चौकशी केली असता रत्नमालानेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे स्पष्ट झाले.
या संबंधाने कबुलीजबाब देताना रत्नमालाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ अविनाश खोब्रागडे याने चार महिन्यांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. खोब्रागडेच्या आत्महत्येसाठी अरुण आणि त्याचे दोन साथीदारच जबाबदार आहे, असा त्यावेळी रत्नमाला आणि खोब्रागडेच्या नातेवाईकांना संशय होता. त्यानंतर त्याच्या मुलीचे लग्न जुळले आणि तुटले. हे लग्न अरुणच्या आईने तोडल्याचा संशय रत्नमालाला होता. अरुणची आई जादूटोणा करते, तिनेच आपल्या प्रणिता नामक मुलीवर जादू केली. त्यामुळे तिची प्रकृती खराब होऊन ती मरणासन्न अवस्थेपर्यंत गेली होती, असाही गैरसमज रत्नमालाला होता. त्याचमुळे ती अरुणवर कमालीची चिडून होती. त्याचा कधी काटा काढतो, असे तिला झाले होते. त्यामुळे मुलगी शुभांगीच्या माध्यमातून तिचा मित्र किसनला तिने अरुणची हत्या करण्यासाठी तयार करून घेतले. ठरल्याप्रमाणे १६ नोव्हेंबरला किसनने अरुणला पारडीत गाठले आणि त्याला भूलथापा मारून घटनास्थळी नेले.
तेथे त्याच्यावर घातक शस्त्राचे घाव घालून त्याला ठार मारले आणि त्याचा ऑटो भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळ नेऊन सोडला. तेथून तोंडाला दुपट्टा बांधून आरोपी पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी किसन विश्वकर्माचा छडा लावला. तेथून त्याची खोली अन् त्याला भाड्याने खोली करून देणारी रत्नमाला गणवीर हे दोन मुद्दे पुढे आले. त्यानंतर किसन आणि रत्नमालाची मुलगी शुभांगीची मैत्री अधोरेखित झाली. या तिघांचे कॉल डिटेल्स, मेसेज तपासल्यानंतर या हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला. विशेष म्हणजे, हत्येची कबुली देणारी रत्नमाला कळमना पोलीस ठाण्यासाठी पंटरगिरी (एजंट/ दलाल) करीत होती, अशी जोरदार चर्चा आहे. तिला पोलिसांचे डावपेच माहीत आहे. त्याचमुळे की काय, तिने वाठोडा पोलिसांनी अटक करताच पोलिसांविरुद्ध मारहाणीचा गंभीर आरोप लावल्याचे समजते.

आरोपीला पश्चात्ताप नाही !
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी तिचा तपास केला असता तिने अरुणचा गेम करून न्याय केल्याचे धक्कादायक विधान केले. या हत्याकांडाचा तिला अजिबात पश्चात्ताप नसल्याचेही तिने पोलिसांसमोर सांगितल्याचे समजते. अरुणबद्दल तिच्या मनात सूडभावना होती, हेही तिने तपासात मान्य केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या थरारकांडाच्या तपासात पोलीस निरीक्षक व्ही. पी. मालचे, एपीआय एन. टी. गोसावी, हवालदार राधेश्याम खापेकर, शिपाई आशिष बांते, हिमांशू पाटील, मंगेश टेंभरे, मिलिंद ठाकरे, चेतन पाटील, मिथून नाईक, दीपक तरेकर, पूनम सेवतकर यांनी मोलाची भूमिका वठविली.

 

Web Title: Bhachi murder case on suspicion of witchcraft: The accused was a police punter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.