नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेला भदाणे अद्याप फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 06:39 PM2022-03-06T18:39:38+5:302022-03-06T18:45:27+5:30
Rape Allegations Accused still wanted : १४ दिवस उलटल्यानंतरही उल्हासनगर पोलिसांना फरार भदाणे सापडेना
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केल्या प्रकरणी तसेच पीएचडी पदवी अवैध असल्या बाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात युवराज भदाणे याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल होऊन १४ दिवस उलटल्यावरही फरार भदाणे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने सर्वस्तरातून पोलिसांवर टीकेची झोळ उठली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याने नोकरीवर लागण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केल्याचा आरोप व लेखी तक्रार समाजसेवक पत्रकार दिलीप मालवणकर यांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी चौकशी समिती नियुक्ती केली. चौकशी समितीने जन्मदाखल्यात फेरफार केल्याचा ठपका ठेवला. दरम्यान गेल्या महासभेने समितीच्या अहवालानुसार भदाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार महापालिका सहायक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून भदाणे यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामध्ये पीएचडी पदवी अवैध असल्याचा उल्लेख करण्यात आहे. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्या प्रकरणी भदाणे याला त्वरित अटक करतील असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र गेले १४ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी भदाणे याला अटक केली नसल्याबद्दल दिलीप मालवणकर यांनी थेट पोलीसांच्या चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे केले.
दरम्यान नवीमुंबई येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी भदाणे याच्यावर गुन्हा दाखल झाला. एपीएमसी पोलीसही भदाणे यांच्या शोधात आहे. कल्याण व ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी भदाणे न्यायालयात उपस्थित राहू शकतो. मात्र पोलिसांना त्याचा ठावठिकाणा कशा लागत नाही. असा प्रश्न मालवणकर यांनी उपस्थित करून अनेक गुन्हे दाखल असलेल्या भदाणे याला पोलीस जाणीवपूर्वक अटक करीत नसल्याचा आरोप केला. तर मध्यवर्ती पोलिसांनी युवराज भदाणे यांच्यावर पोलीस पथक पाळत ठेवून असल्याचे म्हटले आहे. भदाणे याला अटकपूर्व जामीन मिळविण्या पर्यन्त पोलीस त्याला अटक करणार नाही. असा संशय मालवणकर यांनी व्यक्त करून खळबळ उडून दिली आहे.