ऑनलाईन लुटणाऱ्या भामट्याला पुण्यातून अटक; महाराष्ट्रातील ४, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांतील सहभाग उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:54 AM2023-11-08T07:54:34+5:302023-11-08T07:54:56+5:30
एका व्यक्तीची टास्कच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक झाली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला हाेता.
नवी मुंबई : टास्कच्या बहाण्याने, तसेच इतर कारणांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. आकाश उमेश पांडे (३५) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. या आरोपीचा महाराष्ट्रातील ४, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असून, त्याअनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.
एका व्यक्तीची टास्कच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक झाली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला हाेता. या गुन्ह्याचा तपास पाेलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेनि गजानन कदम सपाेनि राजू आलदर, विजय आयरे, संदीप सोलाट यांनी सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे ऑनलाईन लुटणारा आराेपी पुणे परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार सापळा लावून आराेपीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या.
दिल्लीच्या साथीदारांसह चालवायचा रॅकेट
पुण्यातील एका कंपनीत सीएचे काम करत असताना तो दिल्लीतल्या काही साथीदारांसह मिळून ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालवत होता. यासाठी त्याने वापरलेले बँक खाते पोलिसांनी गोठवले असून, त्यात ५ लाख ९० हजार रुपये आढळून आले आहेत, तर त्याचा राज्यातील ४ गुन्ह्यांत, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांत सहभाग समोर आला आहे.
त्यानुसार या रॅकेटने देशभरात अनेकांना ऑनलाइन कमाईचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.